Farooq Abdullah Assassination Attempt: जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांच्या हत्येचा प्रयत्न फसल्यानंतर हल्लेखोर कमल सिंग जामवाल याने धक्कादायक खुलासा केला आहे. फारूख अब्दुल्ला यांची गेल्या २० वर्षापासून हत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या घटनेमागे दहशतवादी कटाचा दावा फेटाळून लावला आहे. एका लग्न समारंभात फारूख अब्दुल्ला यांच्यावर कमल सिंगने जवळून गोळी झाडली पण, सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानामुळे या हल्ल्यातून अब्दुल्ला थोडक्यात बचावले.
दैव बलवत्तर म्हणून वाचले – कमल सिंग
हल्ल्यानंतर पोलिसांनी ६३ वर्षीय कमल सिंग जामवाल याला अटक केली. हल्ला का केला याबाबत विचारणा केली असता कमल सिंग याने धक्कादायक खुलासे केले. “माझ्याकडे असणारे अग्निशस्त्र माझेच असून त्याचा माझ्याकडे परवाना आहे. गेल्या २० वर्षापासून मी त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. हा माझा वैयक्तिक अजेंडा आहे. दैव बलवत्तर म्हणून ते वाचले”, असे कमल सिंग पोलिसांना माहिती देताना म्हणाला.
कोण आहे कमल सिंग जामवाल? (Who Is Kamal Singh Jamwal? who attacked Farooq Abdullah)
गोळीबार केल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि जमावाने संशयित कमल सिंग जामवाल याची धरपकड केली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक करुन चौकशी सुरु केली आहे. कमल सिंगचा जन्म १९६३ मध्ये जम्मूच्या जुनी मंडी परिसरात झाला. ६३ वर्षीय कमल सिंगची शहरात अनेक दुकाने असून ती भाड्याने देण्यात आली आहेत. पोलिसांनी या घटनेमागे दहशतवादी कट असल्याचा संशय फेटाळून लावला आहे. सध्या कमल सिंगची कसून चौकशी केली जात आहे.
घटनेचा व्हिडीओ समोर
फारूख अब्दुल्ला यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. जम्मू येथील एक लग्न समारंभात अब्दुल्ला यांनी हजेरी लावली होती. लग्नमंडपातून इतर सहकारी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुरींदर चौधरी यांच्यासोबत ते जात असताना कमल सिंगने त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. झाडलेली गोळी सुरक्षा रक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे फारूख अब्दुल्ला यांना लागली नाही आणि ते थोडक्यात बचावले. यानंतर कमल सिंगची धरपकड करण्यात आली.
उमुख्यमंत्रीही थोडक्यात बचावले
या हल्ल्यात जम्मू काश्मीरचे विद्यमान उपमुख्यमंत्री सुरींदर चौधरी देखील थोडक्यात बचावले आहेत. हल्लेखोरांना या हल्ल्यासाठी वापरलेली पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. संशयित कमल सिंग यावेळी मद्यधुंद अवस्थेत होता, असे प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना सांगितले. लग्न समारंभ उरकून बाहेर पडत असताना ही घटना घडली असेही यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी म्हटले आहे. दरम्यान, या हल्ल्यात सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही.
