Farooq Abdullah Firing Case: गोळीबारातून बचावल्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी अल्लाहचे आभार मानले. “गोळीबार झाला त्याठिकाणी पोलिस सुरक्षा अतिशय निकृष्ट दर्जाची होती तसेच, या घटनेचा सखोल तपास व्हायला हवा”, असे फारुख अब्दुल्ला म्हणाले. दरम्यान, गोळी झाडल्याची माहितीच नव्हती फटाके वाजवले जात आहेत असे मला वाटले असेही अब्दुल्ला म्हणाले.
अल्लाहच्या कृपेने मी वाचलो – फारुख अब्दुल्ला
गोळीबाराच्या घटनेनंतर फारुख अब्दुल्ला यांनी माध्यमांशी संवाद साधला. “जम्मूत एका लग्न संमारंभाला मी गेलो होतो. नवरा -नवरीची भेट घेतल्यानंतर आम्ही बाहेर जात होतो. बाहेर जात असताना मला कानाजवळ आवाज ऐकू आला. मला वाटलं फटाका असेल. मला घाई गडबडीत गाडीत बसविण्यात आले. त्यानंतर मला सांगण्यात आले की एकाने पिस्तूलातून दोन गोळ्या झाडल्या. माझ्या सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीच्या हातातील पिस्तूल पकडून त्याचा नेम चुकवला. अल्लाहच्या कृपेने मी वाचलो”, असे फारुख अब्दुल्ला म्हणाले.
अमित शाह यांचा फोन
फारुख अब्दुल्ला यांनी यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी फोन करुन चौकशी केल्याचे सांगितले. “अमित शाह यांचा रात्री फोन आला होता. संशयिताला अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली योग्य ती चौकशी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले”, असे फारुख अब्दुल्ला म्हणाले. हल्लेखोरांना गोळीबार का केला? किंवा तो हत्या करण्याचा प्रयत्न का करत होता याची काही कल्पना नसल्याचेही फारुख अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले.
निकृष्ट दर्जाचा पोलिस बंदोबस्त
“या लग्नात अनेक मोठे लोक उपस्थित राहणार होते. त्यामुळे घटनास्थळी पोलिस सुरक्षा तैनात करणे आवश्यक होते. पण, तिथं पोलिसांची सुरक्षा नव्हती. माझी वैयक्तिक सुरक्षाबरोबर असल्याने त्यांनी हा हल्ला हाणून पाडला. या व्यक्तीचा माझ्याविरोधात काय राग आहे? हे माहिती नाही. पण देशात एकूण द्वेषपूर्ण वातावरण तयार झाले आहे”, असे फारुख अब्दुल्ला म्हणाले.
सखोल तपास करण्याची व्यक्त केली गरज
या घटनेत काही कट कारस्थान आहे की नाही हे कालांतराने उघड होईलच पण, केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी यात लक्ष घालून परिस्थिती वाटतेय तितकी खरचं सामान्य आहे का? याचा तपास करायला हवा. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कमल सिंग या संशयिताला अटक केली असून, अधिक तपास केला जात आहे. २० वर्षापासून फारुख अब्दुल्ला यांच्या हत्येचा प्रयत्न करत होतो, असे धक्कादायक खुलासा कमल सिंगने केला आहे.
