FASTag Annual Pass Price Hike 2026: Save money by renewing your NHAI FASTag pass before April 1st : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) १ एप्रिल २०२६ पासून फास्टॅग (FASTag) चा वार्षिक दर वाढवण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी ३ हजार रुपयांना लाँच करण्यात आलेला ‘वार्षिक पास’ एक प्रीपेड टोल प्लॅन आहे, ज्यामध्ये २०० टोल क्रॉसिंग किंवा एक वर्षाचा प्रवास (जे आधी होईल ते) करण्याची सुविधा दिली जाते.
पुढच्या महिन्यामासून फास्टॅगचा वार्षिक पासच्या दरात ७५ रुपयांची वाढ होईल, म्हणजेच या पाससाठी आता ३०७५ रुपये मोजावे लागतील. या दरवाढीची घोषणा करताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ही दरवाढ राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निश्चिती आणि संकलन) नियम, २००८ च्या तरतुदींनुसार करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, या वार्षिक पासचे ५६ लाखांहून अधिक वापरकर्ते असून, खासगी वाहन मालकांकडून या पासचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
“राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती मार्गावरील सुमारे ११५० टोल नाक्यांवर या वार्षिक पास सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या आणि वैध फास्टॅग असलेल्या पात्र नॉन कमर्शियल वाहनांसाठी हे सुधारित दर लागू होतील,” अशी माहिती NHAI कडून देण्यात आली आहे.
त्यामुळे जर तुम्ही १ एप्रिलची मुदत संपण्यापूर्वी हा वार्षिक पास विकत घेतला तर तो तुम्हाला ३००० रुपयांत मिळेल. त्यानंतर तुम्हाला थोडेसे जास्त पैसे मोजावे लागतील.
राजमार्ग यात्रा ॲप याबरोबरच NHAI आणि MoRTH च्या अधिकृत वेबसाइटवरूनही तुम्ही फास्टॅग वार्षिक पास खरेदी करू शकता. हा वार्षिक पास खरेदी करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
ऑनलाईन पास कसा विकत घ्याल?
- वार्षिक पास खरेदी करण्यासाठी आधी NHAI/MoRTH च्या वेबसाइटला भेट द्या. किंवा, तुमच्या स्मार्टफोनवर राजमार्ग यात्रा हे ॲप इन्स्टॉल करा.
- तुमच्या कारचा नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरा.
- यानंतर तुमचा फास्टॅग आयडी एंटर करा. यापूर्वी तुमचा फास्टॅग सक्रिय असल्याची, तो वाहनावर योग्यरित्या लावलेला असल्याची आणि तो तुमच्या वाहनाशी लिंक असल्याची याची खात्री करून घ्या.
- येथे तुम्हाला ३ हजार रुपये (१ एप्रिलपासून ३०७५ रुपये) भरण्यास सांगितले जाईल. पेमेंट करण्यासाठी तुम्ही युपीआय, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करू शकता.
- पेमेंट पूर्ण झाले की हा पास तुमच्या सध्याच्या फास्टॅगला जोडला जाईल. पास सक्रिय झाल्याचा एसएमएस तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर येईल.
