श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर इथल्या सुरक्षा रक्षकांनी देशाच्या पूर्व भागातील इस्लामिक स्टेटशी (आयएस) संबंधित ठिकाणांवर शुक्रवारी छापेमारी केली. यावेळी झालेल्या चकमकीत १५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामध्ये बॉम्बस्फोटातील सुत्रधाराच्या वडिल आणि दोन भावांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं पोलिसांच्या हवाल्यानं दिलं आहे.

रॉयटर्सने पोलिसांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी झालेल्या चकमकीत जेनी हाशीम, रिलवान हाशीम आणि सुत्रधाराचे वडिल मोहम्मद हाशीम यांना शुक्रवारी पूर्व भागात झालेल्या चकमकीत मारले. या तिघांचा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये येथिल स्थानिकांविरोधात बोलत असल्याचे दिसत होते. दहशतवाद्यांना प्रेरणा देत असल्याचेही यामध्ये दिसत होते.

श्रीलंकेच्या लष्कराचे प्रवक्ते सुमित अटापटू यांनी शनिवारी सांगितले की, सुरक्षा रक्षकांनी जेव्हा कलमुनई शहरात बंदुकधाऱ्यांच्या ठिकाण्यांवर घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला, त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.

गेल्या रविवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये तीन चर्च व तीन हॉटेलमध्ये ईस्टर संडेला झालेल्या बाँबस्फोटांमध्ये ३५९ जणांनी प्राण गमावले तर ५०० च्या वर नागरिक जखमी झाले. दहशतवादी सुशिक्षित होते, चांगल्या आर्थिक स्थितीतील होते व त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध होते असे श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. या बाँबस्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेटनं घेतली.

या हल्ल्याप्रकरणी 18 जणांना अटक करण्यात आली आणि एकूण ताब्यात घेतलेल्या संशयितांची संख्या 58 आहे. अनेक दहशतवादी स्फोटक साहित्यासह लपून बसलेले असावेत अशी भीती श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी व्यक्त केली आहे.