Delhi Dwarka Fire News: दिल्लीमधील द्वारका सेक्टर १३ येथील एका अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. येथील एका निवासी इमारतीच्या वरच्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत एका व्यक्तीचा आणि त्याच्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे दिल्लीच्या द्वारका सेक्टर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

एका निवासी इमारतीमध्ये वरील एका मजल्यावर भीषण आग लागली. त्यामुळे संपूर्ण इमारतीमधील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर नागरिकांनी तातडीने आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत इमारतीच्या खाली येण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दरम्यान एका व्यक्तीने आपला आणि त्यांच्या दोन मुलांचा जीव वाचावा म्हणून दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. मात्र, यामध्ये ते तिघेही गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, ही आगीची घटना नेमकं कशामुळे घडली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. अग्निशमन अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सकाळी १० वाजता या आगीच्या घटनेबाबत अग्निशमन दलाच्या विभागाला फोन आला होता. त्यानंतर अग्निशमन दलाच्या ८ गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली. पोलिसांसह अग्निशमन विभाग आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र, ही आग नेमकं कशामुळे लागली? यांचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं अग्निशमन विभागाने सांगितलं आहे.

दरम्यान, या परिसरातील रहिवाशांना आपत्कालीन सेवा कार्यक्षमतेने सुरू ठेवण्यासाठी घटनास्थळापासून दूर राहण्यास सांगितलं आहे. ही आगीची घटना घडली तेव्हा इमारतीतून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट आणि धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या आगीच्या घटनेदरम्यान मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली होती. त्यामुळे द्वारका रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. तसेच वाहतूक पोलिसांचं एक पथकही घटनास्थळी पोहोचलं होतं. त्यानंतर वाहतूक कोंडी दूर करण्यात आली. त्यानंतर रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला. अग्निशमन दल उशिरा पोहोचल्याने स्थानिक लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.