मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ४ वर्षाच्या मुलीचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे बापाला अखेर मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ आली. भर उन्हात हा बाप आपल्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जात होता.

दामोह येथील जिल्हा रुग्णालयात दाखल

मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की त्यांनी तिला सोमवारी बक्सवाह आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले जेथे तिची प्रकृती खालावली. त्यानंतर मंगळवारी कुटुंबीयांनी तिला लगतच्या दामोह येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. मुलीचे आजोबा मनसुख अहिरवार यांनी आरोप केला, की त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तिचा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका मागितली, परंतु त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.

हेही वाचा – लडाखला जाऊन ‘ही’ चूक करू नका! नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आत्तापर्यंत १.५० कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल

खासगी वाहनाची व्यवस्था करण्यासाठी पैसे नव्हते
मुलीचे वडील लक्ष्मण अहिरवार यांनी सांगितले की “आम्ही तिचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळला आणि बक्सवाहासाठी बसमध्ये चढलो कारण आमच्याकडे खासगी वाहनाची व्यवस्था करण्यासाठी पैसे नव्हते, बक्सवाह येथे पोहोचल्यानंतर त्यांनी नगर पंचायतीला एक वाहन उपलब्ध करून देण्यास सांगितले जेणेकरून ते पौडी गावात मृतदेह घेऊन जातील, परंतु त्यांनी नकार दिला.

डॉक्टरांनी दावा फेटाळला
या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, दमोहच्या सिव्हिल सर्जन डॉ. ममता तिमोरी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. “माझ्याकडे रुग्णवाहिका मागण्यासाठी कोणीही आले नाही, आमच्याकडे हिअर्स व्हॅन आहे. आम्ही रेडक्रॉस किंवा इतर कोणत्याही एनजीओकडून त्याची व्यवस्था करू शकतो,” असे तिमोरी म्हणाल्या.

हेही वाचा- “काळवीट मारुन सलमानने मोठी चूक केलीय, तुम्हाला शब्द देतो त्याचा ‘कार्यक्रम’ करु द्या, त्यानंतर…”; बिष्णोईच्या भावाचं वक्तव्य

आरोग्य अधिकाऱ्यांची उदासीन वृत्ती
या अगोदरही मध्यप्रदेशात अनेक वेळा आरोग्य अधिकाऱ्यांची उदासीन वृत्ती दाखवणाऱ्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सागर जिल्ह्यातील एका व्यक्तीने गडकोटा सामुदायिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे आपल्या भावाचा मृतदेह हातगाडीवर नेला असल्याची घटना घडली होती.