British Woman Shot Dead by Father: राजकारण आणि नेत्यांवरून अनेक घरांमध्ये वाद-विवाद होत असतात. अमेरिकेच्या टेक्सासमधील एका घरात डोनाल्ड ट्रम्प आणि बंदूक बाळगण्याच्या धोरणावरून बाप-लेकीत चर्चा सुरू होती. चर्चेचे रूपांतर वादात झाले आणि वडिलांनी स्वतःच्याच मुलीवर गोळी झाडून तिची हत्या केली. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, २३ वर्षीय ब्रिटिश महिला लुसी हॅरीसनचा या गोळीबारात मृत्यू झाला.
सदर प्रकरण वर्षभरापूर्वी घडले होते, मात्र त्याचा खुलासा आता झाला आहे. लुसी हॅरीसन ब्रिटिश नागरिक असून ती तिचे ५१ वर्षीय वडील क्रीस हॅरीसन यांना भेटण्यासाठी डॅलस येथे आली होती. १० जानेवारी २०२५ रोजी तिच्यावर गोळी झाडण्यात आली.
ब्रिटिश नागरिकाचा विदेशात अचानक मृत्यू झालेला असल्यास त्याची चौकशी करण्यात येते. या प्रकरणाचीही चौकशी केली असता वर्षभरानंतर सत्य समोर आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील वादातून हत्या
युकेमधील चेशायर कोरोनर कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. वॉरिंग्टन येथे राहणारी लुसी तिचा प्रियकर सॅम लिटरल बरोबर टेक्सास येथे वडिलांना भेटायला गेली होती. लिटरलने चौकशीत सांगितले की, लुसीचे वडील प्रमाणाबाहेर मद्य घेत होते आणि त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना होता. यावरून लुसी आणि तिच्या वडिलांमध्ये नेहमी वाद होत असत.
हत्येच्या दिवशी सकाळी लुसी आणि लिटरल युकेमध्ये जाण्यासाठी निघाले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरून बाप-लेकीत पुन्हा वाद सुरू झाला. क्रिस आणि लुसीमध्ये मोठा वाद झाला. ज्यानंतर लुसी वरच्या मजल्यावर धावत गेली, अशी प्रतिक्रिया लिटरलने स्काय न्यूजशी बोलताना दिली.
लिटरलने कोर्टात सांगितले की, त्यादिवशी लुसी तिच्या वडिलांनी म्हणाली की, मी पीडित मुलीच्या जागी असते आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला असता तर त्यांना (वडिलांना) कसे वाटले असते? यावर क्रिसने म्हटले की, माझ्याबरोबर माझ्या आणखी दोन मुली राहतात. त्यामुळे मला फार वाईट वाटणार नाही. वडिलांचे उत्तर ऐकून लुसी नाराज झाली होती. ज्यामुळे ती तिच्या खोलीत गेली आणि स्वतःला कोंडून घेतले.
क्रिस यांनी आपल्या वकिलामार्फत कोर्टाला दिलेल्या निवेदनात म्हटले की, लुसी आणि लिटरल युकेला निघण्याआधी मी मुलीची समजूत काढायला तिच्या बेडरूममध्ये गेलो. तेव्हा टीव्हीवर अमेरिकेतील बंदुकीशी निगडीत गुन्ह्याच्या बातम्या दाखवल्या जात होत्या. या बातम्या पाहून लुसीने माझी बंदूक पाहण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर मी माझी ग्लोक ९एमएम हँडगन तिला दाखवली. पण अचानक बंदूक कशी चालली गेली, हे मला माहीत नाही. त्यावेळी मी मद्याची पूर्ण बाटली रिचवली होती.
अमेरिकेत खटला दाखल झाला नाही
दरम्यान या घटनेनंतर टेक्सास पोलिसांनी याची चौकशी केली. मात्र हॅरिसन यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नसल्यामुळे कॉलिन काउंटीमधील एका ग्रँड ज्युरीने त्यांची मुक्तता केली.
