ओबामा प्रशासनाने सध्या लक्षावधी अमेरिकी नागरिकांच्या दूरध्वनी कॉल्सचा तपशील मागविला असून त्यामुळे लोकांकडून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अमेरिकेत ‘व्हेरिझॉन’ ही सर्वात मोठी खासगी दूरसंचार कंपनी असून या कंपनीकडूनच त्यांच्या लक्षावधी ग्राहकांच्या दूरध्वनी कॉल्सचा तपशील मागविण्यात येत आहे.
‘एफबीआय’ या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने या कामी पुढाकार घेतला असून त्यासाठी एप्रिल महिन्यात न्यायालयाकडून अत्यंत गुप्त स्वरूपाचा आदेश घेण्यात आला होता, असे वृत्त ‘गार्डियन’ने दिले आहे. अमेरिकेत तसेच अन्य देशांमध्येही अमेरिकी नागरिकांनी केलेल्या कॉल्सचे तपशील ‘व्हेरिझॉन’कडून दररोज घेण्यात येत आहेत.