अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एफबीआय (FBI) संचालक काश पटेल यांची लवकरच पदावरून हकालपट्टी केली जाऊ शकते, असा दावा एका ताज्या अहवालात करण्यात आला आहे. भारतीय वंशाचे काश पटेल हे ट्रम्प यांचे अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात, मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते विविध वादांच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

वॉशिंग्टन येथील ‘व्हाईट हाऊस करस्पाँडंट्स डिनरमध्ये गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. या कार्यक्रमात अमेरिकेतील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात असतानाही अशा प्रकारची घटना घडल्याने अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे.

वादाचे नेमके कारण काय?

‘पॉलिटिको’ आणि ‘द अटलांटिक’ यांसारख्या प्रतिष्ठित माध्यम संस्थांच्या रिपोर्टनुसार, काश पटेल यांचे पद आता धोक्यात आले आहे. त्यांच्यावरील कारवाईमागे प्रामुख्याने त्यांच्या मद्यपानाच्या सवयीशी संबंधित वाद कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. पटेल यांनी स्वतः मान्य केले आहे की, त्यांच्या तरुणपणात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याप्रकरणी त्यांना दोनदा अटक झाली होती. ‘द अटलांटिक’ने त्यांच्यावर कामाच्या ठिकाणीही मद्यधुंद अवस्थेत राहिल्याचा आरोप केला आहे, ज्या विरोधात पटेल यांनी २५० दशलक्ष डॉलर्सचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

विरोधकांकडून वैद्यकीय चाचणीची मागणी

काश पटेल यांच्या मद्यपानाच्या कथित सवयीमुळे डेमोक्रॅट पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हाऊस ज्युडिशियरी कमिटीतील सदस्यांनी पटेल यांची अल्कोहोल स्क्रीनिंग टेस्ट करण्याची मागणी केली आहे. “त्यांच्या मद्यपानाच्या सवयीमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो,” असा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र, पटेल यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, आपण कर्तव्यावर असताना कधीही नशेत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सायबर हल्ला आणि तांत्रिक अडचणी

मार्च महिन्यात एका इराण-संबंधित हॅकर गटाने काश पटेल यांचा वैयक्तिक ईमेल हॅक केल्याचा दावा केला होता. या हॅकिंगमध्ये त्यांचे वैयक्तिक फोटो आणि बायोडाटा लीक झाला होता, ज्याची पुष्टी न्याय विभागानेही केली आहे. संवेदनशील पदावर असलेल्या व्यक्तीचा डेटा अशा प्रकारे लीक होणे ही ट्रम्प यांच्यासाठी चिंतेची बाब ठरली आहे.

पॅम बोंडी यांची हकालपट्टी आणि पटेल यांचे भवितव्य

काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी अमेरिकेच्या ॲटर्नी जनरल पॅम बोंडी यांना पदावरून हटवले आहे. पटेल हे बोंडी यांना आपले मार्गदर्शक मानत असत. राजकीय विरोधकांवर खटले चालवण्यात आलेले अपयश आणि जेफ्री एपस्टीन प्रकरणाच्या हाताळणीवरून ट्रम्प बोंडींवर नाराज होते. बोंडींच्या हकालपट्टीनंतर आता काश पटेल यांचा क्रमांक लागेल, अशी चर्चा अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

व्हाईट हाऊसचे अधिकृत स्पष्टीकरण

एकिकडे हकालपट्टीच्या चर्चा सुरू असताना, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी मात्र “राष्ट्राध्यक्षांचा अजूनही पटेल यांच्यावर विश्वास आहे,” असे सांगून वेळ मारून नेली आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनातील मागील इतिहास पाहता, कोणत्याही क्षणी पटेल यांना निरोप दिला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय वंशाचे असूनही ट्रम्प यांच्या ‘मागा’ (MAGA) चळवळीचे खंदे समर्थक असलेल्या काश पटेल यांचे भविष्य आता अधांतरी असून, आगामी काही दिवस त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.