scorecardresearch

अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या निवासस्थानी ‘एफबीआय’चे छापे ; राष्ट्राध्यक्ष कार्यालयाशी संबंधित दस्तावेजांचा शोध

अमेरिकेचा विधि विभाग आणि ‘एफबीआय’ने या छापेमारीवर तूर्तास प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या निवासस्थानी ‘एफबीआय’चे छापे ; राष्ट्राध्यक्ष कार्यालयाशी संबंधित दस्तावेजांचा शोध
(संग्रहित छायाचित्र)

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याच्या फ्लोरिडा येथील खासगी क्लब आणि ‘पाम बीच’ येथील ‘मार-ए-लागो’ निवासस्थानावर अमेरिकन तपास यंत्रणा ‘फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन्स’ने (एफबीआय) छापे टाकले. घेण्यासाठी या निवासस्थानातील तिजोरी फोडली, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

त्या छाप्यामुळे ट्रम्प अत्यंत संतप्त झाले आहेत. २०२४ मध्ये पुन्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेऊन ‘व्हाईट हाऊस’ मध्ये जाण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये अडथळे आणण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ट्रम्प यांनी निवेदनात म्हंटले आहे, की फ्लोरिडा येथील माझ्या निवासस्थानात तपास मोहीम सुरू आहे. फ्लोरिडातील पाम बीच येथील मार-ए-लागो येथील माझ्या सुंदर निवासस्थानी ‘एफबीआय’च्या मोठय़ा पथकाने घेराव घातला आहे व येथे छापा टाकून घराचा ताबा घेतला आहे. संबंधित सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी मी दर्शवली असताना, माझ्या घरावर असा छापा टाकणे अयोग्य आहे. त्यांनी माझी तिजोरी फोडली आहे. यात आणि ‘वॉटरगेट’ प्रकरणात काय फरक आहे?

अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांनी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये व्हाईट हाऊस सोडताना गोपनीय कागदपत्रे-दस्तावेज सोबत फ्लोरिडातील मार-ए-लागो येथील आपल्या निवासस्थानी नेले होते. ‘एफबीआय’ने आपल्या छाप्यादरम्यान येथील १५ पेटय़ांत ठेवलेल्या या कागदपत्रांचा शोध घेतला. यातील काही दस्तावेजांवर राष्ट्रीय अभिलेखागारातर्फे ‘गोपनीय दस्तावेजा’ची मोहोर लावण्यात आलेली आहे. अमेरिकेचा विधि विभाग आणि ‘एफबीआय’ने या छापेमारीवर तूर्तास प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

ट्रम्प यांनी ‘व्हाईट हाऊस’ सोडल्यानंतर आपल्या फ्लोरिडा येथील निवासस्थानी गोपनीय कागदपत्रे लपवली आहेत का, हे अमेरिकेच्या विधि मंत्रालयाला या छाप्यांतून तपासायचे असल्याचे वृत्त आहे. ट्रम्प २०२४ मधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपली उमेदवारी घोषित करण्याची तयारी करत असतानाच यांच्या निवासस्थानी ‘एफबीआय’ने हा छापा मारला.

जप्त पेटय़ांत गोपनीय कागदपत्रे असल्याचे वृत्त

ट्रम्प यांची ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी सभागृह ‘अमेरिकन काँग्रेस’वर हल्ला करणाऱ्या जमावाला चिथावणी दिल्याप्रकरणीही चौकशी सुरू आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय अभिलेखागाराने विधि विभागास ट्रम्प प्रशासनाचे ‘व्हाईट हाऊस’मधील दस्तावेज कुठे आहेत, याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अभिलेखागारातर्फे सांगण्यात आले, की ट्रम्प यांच्या मार-ए-लागो निवासस्थानातून कमीत कमी १५ पेटय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात ‘व्हाईट हाऊस’मधील दस्तावेज आहेत आणि त्यातील काही कागदपत्रे गोपनीय आहेत.

राजकीयदृष्टय़ा लक्ष्य : ट्रम्प

अमेरिकेच्या कुठल्याच माजी राष्ट्राध्यक्षाबाबत असे यापूर्वी झालेले नाही. अशा प्रकारचा हल्ला केवळ गरीब किंवा विकसनशील देशांसारख्या तिसऱ्या जगातील देशांत होऊ शकतो, असा आरोप करून ट्रम्प म्हणाले, की या दुर्दैवाने अमेरिका या तिसऱ्या जगाच्या स्तरावरील देश बनला आहे. यापूर्वी अशा प्रकारचा गैरप्रकार घडलेला पाहिला नाही. आपल्याला राजकीयदृष्टय़ा लक्ष्य करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. मी अमेरिकन नागरिकांसाठी माझा संघर्ष कायम ठेवेन

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या