वॉशिंग्टन : अमेरिकेच्या ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने (एफबीआय) कुख्यात गुंड सतिंदरजीत सिंग ऊर्फ गोल्डी ब्रार याचा समावेश ‘टेन मोस्ट वाँटेड’ फरार गुन्हेगारांच्या यादीत केला आहे. तसेच त्याला अटक करण्यासाठी उपयुक्त माहिती देणाऱ्याला १० लाख डॉलरचे बक्षीस घोषित केले आहे. गोल्डी ब्रार हा राजकीय आणि धार्मिक व्यक्तींच्या हत्या, गोळीबार, खून, अपहरण, खंडणी, हल्ले, तसेच अमली पदार्थ व शस्त्रास्त्रांची तस्करी यासारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा संशय असल्याचे ‘एफबीआय’कडून सांगण्यात आले.
गोल्डी ब्रार हा अमेरिकेत राहतो आणि तो उत्तर अमेरिकेतील टोळीचा म्होरक्या असल्याचा संशय आहे. ‘एफबीआय’ने सोमवारी सांगितले की, “सतिंदरजीत सिंग हा दक्षिण कॅलिफोर्नियात, तसेच संपूर्ण अमेरिका आणि कॅनडामधील विविध हिंसक कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या लॉरेन्स बिष्णोई संघटित गुन्हेगारी टोळीशी संबंधित असल्याच्या आरोपावरून हवा आहे.” ३१ वर्षीय गोल्डी ब्रार हा सशस्त्र, धोकादायक असेल आणि तो पळून जाण्याचाही धोका आहे, असा इशाराही ‘एफबीआय’ने दिला आहे.
