Bengaluru Hotel Deaths: पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे कारण पुढे करून बंगळुरूमधील एका ४० वर्षीय व्यक्तीने धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एका पंचतारांकित हॉटेलच्या खोलीत या व्यक्तीने आपल्या ५ आणि १० वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव एस. जी. इम्रान असल्याचे सांगितले जात आहे. आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी एक चिठ्ठी मागे सोडली. ज्यात त्याने पत्नीचे दुसऱ्या पुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त केला. चाकूने गळ्यावर वार केल्यानंतर जखमी अवस्थेत असताना हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान हा बंगळुरूच्या बिलालनगरचा रहिवासी असून तो एका खासगी कॅब कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतो. रविवारी संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास त्याने हॉटेलमध्ये एक खोली घेतली होती. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी मध्यरात्री दुबईहून पाहुणे येणार असल्यामुळे त्यांना घेण्यासाठी आपण आलो असल्याचे सांगितले होते. सोमवारी सकाळी तो चेक-आउट करेल, असेही आरोपीने सांगितले. मात्र ठरलेल्या वेळेनुसार त्याने चेक-आऊट केले नाही, असेही हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितले.
सोमवारी दुपारी साडे बारा वाजता स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला असता त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दुपारी साडे चारच्या सुमारास पुन्हा एकदा दरवाजा ठोठावला. पण तरीही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हॉटेल व्यवस्थापकाने मास्टर कीचा वापर करत दरवाजा उघडला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी गुन्ह्याचे वर्णन करताना सांगितले की, मुली मृतावस्थेत पलंगावर पडल्या होत्या. तर इम्रान जखमी अवस्थेत सोफ्याजवळ पडला होता. पोलिसांनी सांगितले की, रुग्णवाहिकेतून तिघांनाही तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचताच दोन्ही मुलींना मृत घोषित करण्यात आले. तसेच इम्रानवर अद्याप उपचार सुरू आहेत.
पोलीस उपायुक्त मिथुन कुमार जीके म्हणाले, घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे. ती इम्राननेच लिहिली असल्याचा संशय आहे. “माझ्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे मी आयुष्याला कंटाळलो आहे. तिच्या अनैतिक संबंधाचे माझ्याकडे पुरावे आहेत. तिच्या फसवणुकीमुळे मी दुखावलो असून माझ्या मुलींना माझ्याबरोबर घेऊन जात आहे”, असा मजकूर चिठ्ठीत लिहिला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
