* कैलाश सत्यर्थी आणि मलाला युसुफझाई यांना नोबेल पुरस्कार प्रदान
जगातील प्रत्येकाने स्वत:मधील बालमन शोधून त्याचं ऐकण्याची गरज असल्याचे मत कैलाश सत्यर्थी यांनी नोबेल पुरस्कार स्विकारताना व्यक्त केले. प्रत्येकाच्या मनात एक लहान मूलं आहे, त्याचा शोध घ्या आणि जगातील प्रत्येक मूलाची स्वप्ने पूर्ण होतील या उद्देशाने काम करा, असे सत्यर्थी यावेळी म्हणाले. तसेच मुलांची स्वप्ने मोडणं ही एक प्रकारची हिंसाच असल्याचेही सत्यर्थी यावेळी म्हणाले.
नॉर्वेतील ऑस्लोमध्ये एका शानदार कार्यक्रमात कैलाश सत्यर्थी आणि मलाला युसुफझाई यांना यंदाचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना कैलाश सत्यर्थी यांनी सर्वप्रथम भारतमातेला वंदन करून पुरस्कार स्वीकारला. मूलांना शिक्षण मिळालं नाही तर मानवतेचा अपमान होईल अशी भावना यावेळी सत्यर्थी यांनी व्यक्त केली. प्रत्येक मूलाला शिक्षण मिळेल याची वैयक्तिक स्तरावर प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी, असेही ते पुढे म्हणाले. मलाला सारख्या कतृत्त्ववान मूलीसोबत हा पुरस्कार स्वीकारत असताना अतिशय आनंद होत असून मलालाच्या निमित्ताने आज एका भारतीय पित्याला पाकिस्तानी मूलगी मिळाली असल्याची भावना सत्यर्थी यांनी व्यक्त केली. मुलं बालकामगारीतून मुक्त होतात तेव्हा मी त्यांच्या चेहऱयावरचा आनंद पाहलाय, त्यामुळे त्यांचा आनंद त्यांना घेऊ द्या असेही सत्यर्थी पुढे म्हणाले. तसेच प्रत्येक मूलाप्रती करुणा दाखवून जगाला संघटीत करुया असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. तर, मलालाने पुरस्कार स्वीकारताना हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून शिक्षणाच्या अधिकारासाठी झटणाऱया प्रत्येक मूलाचा असल्याची भावना व्यक्त केली. विशेष म्हणजे, कैलाश सत्यर्थी यांच्यासोबत हा पुरस्कार घेताना भारत-पाकिस्तान बालहक्कांसाठी एकत्र काम करेल हे जगाला दाखवून देऊ असा विश्वास असल्याचे मलालाने सांगितले. तसेच इस्लामच्या नावावर दहशतवाद पसरविणाऱयांचा निषेध देखील मलालाने व्यक्त केला. मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी यापुढेही लढत राहीन, असेही ती पुढे म्हणाली. 
एका माणसाची हत्या म्हणजे मानव जातीची हत्या, ही कुराणची शिकवण असल्याचे सांगत मलालाने आज युद्ध करणं सोपं पण शांताता प्रस्थापित करणं अवघड का?, हातात बंदुका देणं सोपं, पण त्याच हातात पुस्तकं देणं अवघड का? असा सवाल देखील यावेळी उपस्थित केला.