मुंबईत भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेचा लैंगिक छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बोरिवलीत ही घटना घडली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणावरुन काँग्रेस आणि शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचा आवाज दाबण्यासाठी भाजपा नगरसेविकांनी मारहाण केली असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

“भाजपाचे नेते महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. फडणवीस सरकारच्या काळातच महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले होते. दुसरीकडे देशपातळीवर भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. आत्ताची घटना त्यापेक्षाही गंभीर आहे. भाजपाच्या महिला नेत्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात आणि दुसरीकडे त्यांच्या कार्यालयात विनयभंग होतो ही गंभीर बाब आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या महिलेने खासदार गोपाळ शेट्टी व आमदार सुनील राणे यांना पत्र लिहून मदत मागितली. मात्र त्यांनी न्याय दिला नाहीच उलट तेथील भाजपा नगरसेविकांनी महिलेला मारहाण केली. हे यांचं खऱं चरित्र आहे आणि महिला अत्याचारासंबंधी हीच यांची भूमिका आहे. त्यामुळे फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. भाजपाच्या कार्यालयातच महिला सुरक्षित नाहीत,” असं सचिन सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.


सचिन सावंत यांचं ट्वीट –

“भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग झाला आणि महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचा आवाज दाबण्यासाठी भाजपा नगरसेविकांनी मारहाण केली. हे भाजपाचे महिला विरोधी रुप आहे,” अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

“फडणवीस साहेब आणि चंद्रकांत दादांनी महिलेचा आवाज दाबला त्या भाजपा नेत्यांवर काय कारवाई करणार हे स्पष्ट करावं. संपूर्ण भाजपा अत्याचार झालेल्या महिलेच्या विरोधात उभी आहे. अत्याचार करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत,” असा आरोप करत सचिन सावंत यांनी निषेध दर्शवला आहे.

भाजपाची ताईगिरी गेली कुठे?

“धाय मोकळून रडणाऱ्या भाजपाच्या ताई आज कुठे आहेत? भाजपाच्या ताईंचा फोन आज सकाळपासून बंद आहे. भाजपाच्या ताई पब्लिक स्टंटसाठी पुढे येणार आणि आता गप्प बसणार…भाजपाच्याच कार्यालयात महिलेला छळलं जातं, मारहाण होते. यांच्या दिव्याखालीच अंधार आहे. मी स्वत: बोरिवलीच्या प्रकरणात लक्ष घालणार असून पोलीस स्टेशनला जाणार आहे. केवळ महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम भाजपाकडून होत आहे. कोणत्याही पक्षाची महिला असो, अन्याय होत असेल तर भूमिका घेतली पाहिजे. मी असते तर थोबाड फोडून टाकलं असतं,” असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.