California Senator Marie Alvarado Gil News: अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील वरीष्ठ सभागृहाच्या सदस्या (सेनेटर) मेरी अल्वाराडो-गिल यांनी पुरुष कर्मचाऱ्याकडून लैंगिक सुखाची मागणी करत बळजबरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. “लैंगिक सुखाची मागणी केल्यानंतर माझ्या पाठीला आणि मणक्याला दुखापत झाली”, असा दावा गिल यांचे माजी चीफ ऑफ स्टाफ चाड कँडीट यांनी केला आहे. माजी सिनेट सदस्य गॅरी कँडीट यांचा मुलगा असलेल्या चाड कँडीट यांनी आता याबद्दल कायदेशीर खटला दाखल केला असून प्रवासादरम्यान गिल लैंगिक सुखाची मागणी करत असत, असा आरोप केला आहे. यावर गिल यांच्या वकिलानेही प्रत्युत्तर दाखल केले असून कँडीट यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
सॅक्रामेंटो सुपीरियर न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यानुसार, कँडीट यांनी दावा केला की, नोकरी टिकविण्यासाठी त्यांनी गिल यांच्या लैंगिक सुखाच्या मागणीची प्रतिपूर्ती केली. मेरी अल्वाराडो-गिल या पूर्वी डेमोक्रॅट पक्षात होत्या, आता त्या रिपब्लिकन पक्षाच्या सदस्या आहेत.
हे वाचा >> धक्कादायक! शिक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळले विद्यार्थिंनींचे पाच हजारांहून अधिक अश्लील व्हिडिओ
मेरी अल्वाराडो-गिल यांच्याविरोधात दाखल केलेल्या खटल्यात कँडीट यांनी असाही दावा केला की, गिल यांनी कार्यालयात दहशतीचे वातावरण तयार केले होते. तसेच आपले शेवटचे भांडण झाले, तेव्हा गिल यांनी एका छोट्याश्या गाडीत माझ्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली. ज्यामुळे माझ्या पाठीला जबर दुखापत झाली आणि ज्यामुळे माझ्या तीन हाडांना मार बसला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात कँडीट यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. पाठीच्या दुखापतीचे कारण देत त्यांनी गिल यांच्या मागणीला नकार दिला होता, म्हणून ही कारवाई झाली, असे ते म्हणाले. तसेच नोकरीवरून काढून टाकण्याआधी गिल यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत कँडीट यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती. तसेच कँडीट यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले होते.
कँडीट यांनी पुढे असेही सांगितले की, गिल यांनी आपल्या पतीचीही यानिमित्ताने फसवणूक केली आहे. २०२२ साली कँडीट गिल यांच्या कार्यालयात कर्मचारी प्रमुख म्हणून नियुक्त झाले होते. कँडीट यांनी न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर गिल यांच्या वकिलांकडूनही प्रत्युत्तर देत कँडीट यांच्यावर आरोप केले गेले आहेत.
मेरी अल्वाराडो-गिल कोण आहेत?
मेरी अल्वाराडो-गिल यांचा जन्म २४ डिसेंबर १९७३ रोजी झाला. त्या अमेरिकेतील प्रभावशाली राजकारणी म्हणून ओळखल्या जातात. कॅलिफोर्नियाच्या वरिष्ठ सभागृहात २०२२ साली त्यांची निवड झाली. सुरुवातीला त्या डेमोक्रॅट पक्षाच्या सदस्य होत्या. मात्र त्यांनी ८ ऑगस्ट २०२४ रोजी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला.
२०१८ साली गिल यांनी गंभीर आजारांचा सामना केला होता. त्यांना मानेचा आणि थायरॉईडच्या कर्करोगाचे निदान झाले होते. २०१९ साली त्यांनी या आजारांवर यशस्वीरित्या मात केली होती.