नैऋत्य चीनमधील ‘सुंदर राज्यपाल’ (the beautiful governor) अशी ओळख असलेल्या महिलेला आता १३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच एक लाख ४० हजार डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या महिलेचे तिच्याच कार्यालयातील ५८ पुरुषांशी लैंगिक संबंध असल्याचे समोर आले होते. तसेच तिने ७१ कोटींची लाचही स्वीकारली होती. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या बातमीनुसार ५२ वर्षीय झोंग यांग यांनी गुइझोउ प्रांताच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. त्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीन (CPC) च्या सदस्यही होत्या. मात्र त्यांचे कारनामे समोर आल्यानंतर आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

झोंग यांग कोण आहेत?

यांग यांनी २२ व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवत कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीन (CPC) मध्ये प्रवेश केला होता. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या बातमीनुसार झोंग यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी फळ आणि कृषी संघटनेची स्थापना केली होती. तसेच वृद्धांना मदत करण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन अनेक कार्यक्रम राबविले. या कामामुळे झोंग यांना प्रसिद्धी मिळाली होती.

जानेवारी २०२४ मध्ये गुइझौ रेडिओ आणि टीव्ही वृत्तवाहिनीने त्यांच्यावर एका माहितीपटाचे प्रदर्शन केले. त्यानंतर झोंग यांग वादात अडकल्या. सरकारी विभागात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली झोंग यांनी पसंतीच्या कंपन्यांना कंत्राटे मिळवून दिली आणि त्याबदल्यात लाच स्वीकारली, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.

हे वाचा >> Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस

लैंगिक संबंधाचे आरोप काय होते?

झोंग यांग यांनी पुरुष सहकाऱ्यांबरोबर संबंध प्रस्थापित करता यावेत यासाठी आपल्या अधिकार आणि पैशांचा दुरुपयोग केला. त्यांनी ओव्हर टाईम आणि व्यावसायिक दौऱ्याच्या नावावार प्रियकरांशी संबंध जपले. चीनमधील नेटइज न्यूजशी बोलताना झोंग यांग यांनी सांगितले होते, “माझ्याकडून लाभ मिळावा यासाठी अनेक पुरूष माझा प्रियकर होणे पसंत करत.” तर काही पुरूषांनी झोंग यांच्या धाकाला घाबरून अनिच्छेने लैंगिक संबंध ठेवले. झोंग यांग यांचे ५८ प्रियकर होते, अशी माहिती आता समोर आलेली आहे. यातील अनेक प्रियकरांबरोबर झोंग यांग यांनी लैंगिक संबंध ठेवले होते.

झोंग यांग यांच्यावरील गुन्हे सिद्ध झाल्यानंतर त्यांना आता १३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच १ लाख ४० हजार डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे.