पाळीव प्राण्यांचा लळा असणारे अनेकजण असतात. त्यांचा विरह अनेकांना सहन होत नाही. हैदराबादमधली एक सून्न करणारी घटना समोर आली आहे. पाळीव मांजर मेल्याने महाविद्यालयीन मुलीने विष पिऊन आयुष्य संपवलं आहे. हैदराबादच्या मीरपेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. २० वर्षीय विद्यार्थिनीने मांजरीचा मृत्यू सहन न झाल्याने या मुलीने आत्महत्या केली. मांजर मेल्याचं दुःख तिला सहन झालं नाही.

पोलिसांनी काय सांगितलं?

घरात पाळलेल्या मांजरीचा मृत्यू झाला त्यामुळे हिमाबिंदू नावाची मुलगी खूप अस्वस्थ झाली. त्यानंतर तिने घरात असलेल्या किटकनाशक द्रव्याचं सेवन केलं. ज्यानंतर तिची प्रकृती बिघडली. कुटुंबाने तिला रुग्णालयात नेलं पण डॉक्टर तिचा जीव वाचवू शकले नाहीत. पोलिसांनी असंही सांगितलं की मीरपेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कुमार म्हणाले की हिमाबिंदूच्या मांडीवरच तिच्या मांजरीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने हिमाबिंदूने आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितलं की आम्ही हिमाबिंदूचा मृतदेह आम्ही तिच्या आई वडिलांकडे सुपूर्द केला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

पाळीव मांजरीचा मृत्यू असह्य झाल्याने २० वर्षीय मुलीने टोकाचं पाऊल उचललं

आपल्या पाळीव प्राण्यावर असलेलं प्रेम आणि त्यातून या मुलीने उचलेलं टोकाचं पाऊल हे सगळं पाहून तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. असं काही घडेल अशी पुसटशीही कल्पना या मुलीच्या कुटुंबाला नव्हती. पाळीव मांजरीची मृत्यू झाल्याने बीएससीचं शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं आहे.