आणखी काही काळ सावधगिरी बाळगण्याचे मंडाविया यांचे आवाहन
नवी दिल्ली : करोनाविरोधातील लढा अंतिम टप्प्यात आहे. मात्र, करोनाचे उच्चाटन होईपर्यंत बेफिकीर राहू नका, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी गुरुवारी जनतेला केले.




देशातील करोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी मंडाविया यांनी गुरुवारी राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे बैठक घेतली. देशाचा करोनाविरोधी लढा अंतिम टप्प्यात आहे. मात्र, आणखी काही काळ सावधगिरी बाळगावी लागणार आहे. यामुळे ‘हर घर दस्तक’ या मोहिमेअंतर्गत सर्व प्रौढ नागरिकांच्या लसीकरणावर भर द्यावा, अशी सूचना मंडाविया यांनी या बैठकीत केली.
लसीकरण आणि नियम पालन हे करोनाविरोधी प्रतिबंधक उपाय आहेत. त्यामुळे लशीच्या ‘सुरक्षा कवचा’पासून कोणीही वंचित राहणार नाही, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. सध्या १२ कोटी नागरिकांच्या दुसऱ्या लसमात्रेची वेळ झालेली आहे. या नागरिकांना दुसरी लसमात्रा घेण्यासाठी प्रोत्साहन देऊन संपूर्ण लसीकरणाची उद्दिष्टपूर्ती करावी, असे मंडाविया म्हणाले.
७९ टक्के नागरिकांना पहिली मात्रा
देशात आतापर्यंत १८ वर्षांवरील ७९ टक्के नागरिकांना पहिली लसमात्रा मिळाली आहे. त्यातील ३८ टक्के नागरिकांना दोन्ही लसमात्रा मिळाल्या आहेत. तसेच सध्या १२ कोटी नागरिकांच्या दुसऱ्या लसमात्रेची वेळ झालेली आहे, असे मंडाविया यांनी सांगितले.