अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार स्थापन होताच परस्परांमध्ये वादही सुरू झाले आहेत. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकारची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी काबूलच्या प्रेसिडेंशियल पॅलेसमध्ये प्रमुख नेत्यांमध्ये मोठी वादावादी झाली. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानमधील दोन प्रतिस्पर्धी गटांच्या समर्थकांमध्ये प्रेसिडेंशियल पॅलेसमध्ये भांडण झाले. मात्र, तालिबानने अशा बातम्यांचे खंडन केले आहे.

तालिबानचा सह-संस्थापक आणि उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादार अनेक दिवसांपासून बेपत्ता झाल्यानंतर दोन गटांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. सूत्रांनी बीबीसी पश्तोला सांगितले की, बरादार आणि नवीन कॅबिनेटमधील मंत्री आणि हक्कानी नेटवर्कचे सर्वोच्च नेता खलील उर रहमान हक्कानी यांच्या अनुयायांमध्ये जोरदार भांडणानंतर झाले. यानंतर दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांशी भिडले. अफगाणिस्तानमधील विजयाचे श्रेय कोणाचे यावरून मतभेद सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

तालिबानमधील राजकीय नेत्यांनी सरकारमधील हक्कानी नेटवर्कच्या प्रमुखतेला विरोध केला आहे. त्याच वेळी, हक्कानी नेटवर्क स्वतःला तालिबानचे सर्वात लढाऊ युनिट मानते. मुल्ला बरादार याच्या म्हणण्यानुसार त्याच्या मुत्सद्दीपणामुळे अफगाणिस्तानवर विजय मिळवता आला. पण हक्कानी याचे मत आहे की हा विजय लढाईद्वारे मिळाला आहे. सत्ता स्थापन केल्यानंतर लगेचच असा अंदाज बांधला जात होता की बरादारचा मृत्यू झाला आहे, पण तालिबानच्या सूत्रांनी हा दावा फेटाळून लावला. बरादार याने सोमवारी एक ऑडिओ क्लिप जारी करत आपण जिवंत असल्याचे सांगितले. “मीडिया नेहमी खोटा प्रचार प्रकाशित करते. म्हणून, ती सर्व खोटे धैर्याने नाकारा, आणि मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो की आम्हाला कोणतीही समस्या नाही,” बरादार म्हणाला होता.

दोहा येथे अमेरिका आणि तालिबान यांच्यातील चर्चेच्या अनेक फेऱ्यांमध्ये अब्दुल गनी बरादार हे सर्वात पुढे होते. अशा परिस्थितीत बरादार अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याचे श्रेय घेत आहेत. दुसरीकडे, हक्कानी नेटवर्क तालिबानचे सर्वात भयानक मानले जाते, ज्यांचे पाकिस्तानी सैन्याशी घनिष्ठ संबंध आहेत.

तालिबानमध्ये अनेक पातळ्यांवर मतभेद आहेत. कंदाहार प्रांतातून आलेले तालिबानी नेते आणि उत्तर आणि पूर्व अफगाणिस्तानमधील नेत्यांमध्ये मतभेद आहेत. कंदाहार हा तालिबानचा गड मानला जातो. अशा स्थितीत तिथल्या नेत्यांना सत्तेत महत्त्वाचा सहभाग हवा असतो. गेल्या काही दिवसांपासून बरादार सार्वजनिक ठिकाणी दिसला नाही. यामुळे गोळीबारात तो जखमी किंवा मरण पावल्याच्याही अफवा पसरल्या होत्या.