सध्या पाकिस्तानमध्ये राजकीय उलथापालथ होत आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारवर अविश्वास ठरावाची टांगती तलवार असतानाच हे प्रकरण आता थेट पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात पोहचलं आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाबाहेरही इम्रान खान सरकारमधील माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी आणि पत्रकार मतीउल्लाह जन यांच्यामध्ये चांगलाच शाब्दिक कलगीतुरा रंगला. हा वाद इतका वाढला की पत्रकाराने फवाद खान यांना थेट ‘किराये के ट्टू’ म्हटलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानचे मंत्री आणि पत्रकारामध्ये सुरू झालेला हा वाद तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक झालेला पत्रकार मंत्री चौधरी यांच्या आणि समोरील माध्यमांच्या कॅमेरांसमोर येऊन भांडू लागला. त्यामुळे हा वाद न मिटताच पत्रकार परिषद गुंडाळावी लागली.

नेमकं काय झालं?

पाकिस्तानमधील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात पाकिस्तानची संसद विसर्जित करण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवरील सुनावणीची माहिती देण्यासाठी पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडायला सुरुवात केली. मात्र, पत्रकार मतीउल्लाह जन यांनी त्यांचं म्हणणं मांडण्यास सुरुवात होताच अविश्वास ठरावामागे षडयंत्र नसल्याचं सिद्ध झालंय, यावर काय बोलाल प्रश्न विचारला.

“ऐसे लोग किराये पर आते है”

यावर चौधरी यांनी आधी मी माझी भूमिका मांडतो आणि मग प्रश्नोत्तरं होतील असं म्हटलं. यानंतरही या पत्रकाराने आपला प्रश्न पुन्हापुन्हा विचारण्यात प्रश्नापासून का पळत आहात असं म्हणण्यास सुरुवात केली. मंत्री चौधरी यांच्या बोलण्यात वारंवार अडथळा आणल्यानंतर चौधरी यांनी या पत्रकाराला उद्देशून असे लोक भाड्याने येतात (ऐसे लोग किराये पर आते है) असं म्हटलं.

“किराये के ट्टू आप होंगे”

यावर संतापलेल्या पत्रकाराने ‘किराये के ट्टू आप होंगे’ म्हणत आक्रमक भूमिका घेतली. पत्रकाराने थेट कॅमेरांसमोर येऊन मंत्री चौधरींसोबत भांडण्यास सुरुवात केली. इतर पत्रकारांनी या आक्रमक पत्रकाराला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या पत्रकाराने न ऐकल्याने मंत्री चौधरी यांना आपली पत्रकार परिषद गुंडाळावी लागली.

हेही वाचा : “इम्रान खान ‘या’ गोष्टीची किंमत मोजत आहेत”, पाकिस्तानमधील उलथापालथीबाबत रशियाचा गंभीर आरोप

विशेष म्हणजे याच पत्रकाराने जोपर्यंत पीटीआय पक्षाचे नेते फवाद चौधरी आणि पाकिस्तान तेहरिक ए इंसाफचे नेते असद उमर माफी मागत नाही तोपर्यंत त्यांचा बहिष्कार करत असल्याची घोषणा केली.