scorecardresearch

लढाऊ विमानांची टक्कर ;मध्य प्रदेशातील दुर्घटनेत एका वैमानिकाचा मृत्यू, दोघे बचावले

भारतीय हवाई दलाची दोन लढाऊ विमाने शनिवारी पहाटे मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात दुर्घटनाग्रस्त झाली.

लढाऊ विमानांची टक्कर ;मध्य प्रदेशातील दुर्घटनेत एका वैमानिकाचा मृत्यू, दोघे बचावले

पीटीआय, नवी दिल्ली/मुरैना/भरतपूर

भारतीय हवाई दलाची दोन लढाऊ विमाने शनिवारी पहाटे मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात दुर्घटनाग्रस्त झाली. नियमित प्रशिक्षणासाठी केलेल्या उड्डाणानंतर दोन्ही विमानांची टक्कर होऊन त्यात एका वैमानिकाचा मृत्यू झाला, तर दोन वैमानिकांनी आपत्कालीन सुटका करून घेतल्याने ते बचावले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सुखोई-३० एमकेई’ आणि ‘मिराज-२०००’ या दोन विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरून नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाण केल्यानंतर ती दुर्घटनाग्रस्त झाली. ‘सुखोई-३० एमकेई’ या विमानाच्या दोन वैमानिकांनी आपत्कालीन मार्गाचा अवलंब करून सुटका करून घेतली, मात्र ‘मिराज-२०००’चे वैमानिक विंग कमांडर हनुमंत राव सारथी यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती हवाई दलातर्फे देण्यात आली. दोन्ही विमानांचे ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतरच अपघातामागील कारण सांगता येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हवाई दलाच्या या लढाऊ विमानांनी शनिवारी पहाटे ५.३० वाजता नियमित उड्डाण प्रशिक्षण मोहिमेंतर्गत ग्वाल्हेर तळावरून उड्डाण केले. विमानांतील तीन वैमानिकांपैकी एकास गंभीर जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमागील कारणांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुरैनाचे जिल्हाधिकारी अंकित अस्थाना यांनी सांगितले की, एका वैमानिकाचा मृतदेह पहाडगढ परिसरात सापडला. तसेच याच परिसरात दोन्ही दुर्घटनाग्रस्त विमानांचे अवशेषही सापडले. काही अवशेष राजस्थानमधील भरतपूर परिसरातही कोसळले. मध्य प्रदेशचा हा परिसर राजस्थानलगत आहे.


एक विमान एका खुल्या मैदानी भागात दुर्घटनाग्रस्त झाले. अपघातस्थळी सर्वप्रथम स्थानिक रहिवासी पोहोचले, अशी माहिती राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्याम सिंह यांनी दिली. हवाई दल प्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना या अपघाताची माहिती दिली, असे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी, स्थानिक प्रशासनाला बचाव आणि मदतकार्यात हवाई दलाला सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मिराज-सुखोईचा पहिलाच अपघात
तज्ज्ञाच्या मते, ‘मिराज २०००’ आणि ‘सुखोई-३०एमकेआय’ यांची हवेत टक्कर होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. हवाई दलाने या अपघातात दोन्ही विमाने गमावली आहेत. सुखोई हे द्विचालक लढाऊ जेट होते, तर फ्रेंच कंपनी ‘दसॉल्त एव्हिएशन’निर्मित ‘मिराज २०००’ हे एकल चालक विमान होते.

‘७० वर्षांत ३९ वैमानिक गमावले’
भारताने गेल्या ७० वर्षांत हवेतील टकरींमध्ये ६४ विमाने आणि ३९ वैमानिक गमावले आहेत. देशाने ११ मिग-२१ विमाने, आठ हंटर आणि पाच जग्वार विमाने गमावली, अशी माहिती विमानोड्डाण इतिहासकार अर्चित गुप्ता यांनी दिली.

शूर हवाई योद्धे विंग
कमांडर सारथी यांच्या निधनामुळे खूप दु:ख झाले. त्यांच्या शोकाकुल कुटुंबाप्रति मी संवेदना व्यक्त करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहोत.- राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 03:04 IST