वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असणार भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी आता पद्मावती या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात उडी घेतली आहे. इतिहासाची मोडतोड सहन केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पद्मावती, महाराणी, हिंदू आणि शेतकऱ्यांची मस्करी केली जात आहे. हे चुकीचं होत आहे, हे सरकार आणि प्रशासनाला समजलं पाहिजे.  पद्मावती चि़त्रपटावर बंदी घातली पाहिजे, असे ते म्हणाले. चित्रपट क्षेत्रातून याबाबत टीका केली जात आहे, असे त्यांना सांगितले असता ते म्हणाले की, चित्रपट सृष्टीला कुठली अस्मिता किंवा राष्ट्रवादाशी काही देणे घेणे नाही. त्यांना फक्त पैसा हवा आहे. यासाठी ते नग्न नाचण्यासही तयार होतील, असे ते म्हणाले. दि. १ डिसेंबर रोजी पद्मावती चित्रपट प्रसिद्ध होणार आहे.

साक्षी महाराजांपूर्वी भाजप खासदार चिंतामणी मालवीय यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत मालवीय यांनी चित्रपट जगतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान, चित्रपटाबाबत वाद वाढत असल्यामुळे संजय भन्साळी यांनी गुरूवारी पद्मावतीच्या फेसबुकवरून एक निवेदन जारी करून वाद मिटवण्याचे आवाहन केले आहे. चित्रपटात कोणतेही वादग्रस्त दृश्य नाही. हा चित्रपट राणी पद्मावतीचे साहस, धाडसावर आधारित आहे. त्यांच्या बलिदानाला आम्ही नमन करतो, अफवांकडे लक्ष देऊ नका असे आवाहन त्यांनी केले. हा चित्रपट प्रामाणिकपणे व जबाबदारीने तयार केल्याचेही ते म्हणाले.