Goa Police attacked in Madhya Pradesh: सराईत गुन्हेगाराला सोडविण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये गोवा पोलिसांच्या वाहनावर १५-२० जणांच्या टोळक्याने हल्ला केला. दुचाकीवरुन आलेल्या मास्कधारी गुंडांनी पोलीस वाहनावर हल्ला करत तोडफोड केली. या गुंडांनी पोलिसांच्या ताब्यातून गुन्हेगाराला सोडविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मध्यप्रदेशातील अलीराजापूर जिल्ह्यात घडलेल्या घटनेत गोवा पोलीस सेवेतील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.
पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा
हिरा सिंह बामनिया हा सराईत गुन्हेगार असून, २००९ पासून २०२० पर्यंत विविध गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे. गोव्यातील बोरी ठाण्याचे पोलीस त्याचा शोध घेत होते. गेल्या पाच वर्षापासून अटक टाळण्यासाठी तो पोलिसांना गुंगारा देत होता. बामनिया मध्यप्रदेशात असल्याची माहिती मिळताच गोवा पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन बामनियाला गोव्यात आणले जात असताना ही घटना घडली.
गुन्हेगाराच्या सुटकेसाठी प्रयत्न
वैद्यकीय तपासणी करुन ट्रान्झिट रिमांडवर बामनियाला गोव्यात आणले जात असताना १५ ते २० जणांच्या टोळक्याने पोलिसांच्या वाहनावर हल्ला केला. गुन्हेगार बामनियाची पोलिसांच्या ताब्यातून सुटका करण्याचा त्यांचा हेतू होता मात्र, पोलिसांनी हा कट उधळून लावला. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी काळ्या कपड्याने चेहरा झाकला होता. वाहनाला चारी बाजुने घेरुन त्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या वाहनांवर हल्ला
टोळक्याकडून सुरुवातीला वाहनावर दगडफेक करण्यात आली. धारदार शस्त्रांनी वाहनाची तोडफोड करण्यात आली. यात वाहनाच्या काचा फुटल्या असून इतर भागाचे नुकसान झाले आहे. पण, गुंडांना पोलिसांच्या ताब्यातून गुन्हेगाराला सोडविण्यात यश आले नाही. यानंतर स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले व गोवा पोलिस आणि गुन्हेगाराला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
गुन्हा दाखल, तपास सुरु
पोलिसांनी याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, शासकीय संपत्तीचे नुकसान करणे आणि धारदार शस्त्रांचा वापर या कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरु आहे. दरम्यान, हल्लेखोर गुन्हेगाराच्या जवळचे असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. गोवा पोलीस आणि मध्य प्रदेश पोलीस यांच्यात या तपास प्रकरणी समन्वय सुरु असून, पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे.

