Wing Commander Namansh Syal Last Rites: दुबईतील एअर शो दरम्यान शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) स्वदेशी बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानाचा अपघात झाला. या अपघातात विंग कमांडर नमांश सियाल यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे आज (२३ नोव्हेंबर) पार्थिव हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील गावी आणण्यात आले. नमांश सियाल यांच्या पत्नी आणि हवाई दलाच्या अधिकारी अफसान यांनी साश्रू नयनांनी पतीला शेवटचा सॅल्यूट करत निरोप दिला. यावळी लष्करी इतमामात सियाल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विंग कमांडर नमांश सियाल यांचे पार्थिव रविवारी अंत्यसंस्कारासाठी हिमाचल प्रदेशमधील त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. यावेळी भारतीय हवाई दलाचे अधिकारी, त्यांच्या पत्नी, मुलगी आणि इतर कुटुंबियांसह गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
एएनआय वृत्तसंस्थेने अंत्यसंस्काराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात हवाई दलाच्या अधिकारी आणि सियाल यांच्या पत्नी अफशान या साश्रू नयनांनी पतीला शेवटचा सॅल्यूट करताना दिसल्या. नमांश सियाल यांच्या पश्चात कुटुंबात पत्नी, सहा वर्षांची मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे.
हवाई दलाच्या वतीने हवेत गोळीबार करत लष्करी इतमामात नमांश सियाल यांना अखेरचा निरोप दिला. ३४ वर्षीय नमांश सियाल हे एक उत्तम वैमानिक आणि कामात व्यावसायिक शिस्त बाळगणारे होते, असे वर्णन हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी केले.
विंग कमांडर नमांश सियाल यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले होते, त्या शाळेचे विद्यार्थी पंकज चड्ढा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटले, मीही सैनिक स्कूल सुजानपूर तिरामध्ये शिक्षण घेतले होते. आम्ही आमचा हिरा गमावला. नमांश सियाल आमच्या शाळेचा अभिमान होता.
वडील सैन्यदलातून निवृत्त, पत्नी हवाई दलातील अधिकारी
नमांश सियाल यांचे वडील जगन नाथ सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी हिमाचल प्रदेशच्या शिक्षण विभागात मुख्याध्यापक म्हणून काम केले होते. नमांश यांच्या आई बिना देवी या अपघातावेळी हैदराबाद येथे मुलगा आणि सून यांना भेटायला गेल्या होत्या. नमांश यांच्या पत्नी अफसान यादेखील हवाई दलात अधिकारी आहेत.

दुबईत तेजस विमानाचा अपघात कसा झाला?
शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) दुबईत एअर शो दरम्यान लढाऊ विमानांची प्रात्यक्षिके सादर करण्यात येत होती. भारताचे बहुचर्चित तेजस लढाऊ विमानानेही या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. ‘तेजस’ची प्रात्याक्षिके दाखविण्याची जबाबदारी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर नमांश सियाल यांच्याकडे देण्यात होती. त्यादरम्यान दुपारी २ वाजून १० मिनिटांच्या सुमारास आठ मिनिटांचे प्रात्यक्षिक सादर करत असताना तेजस विमान अचानक खाली कोसळले. प्रत्यक्षदर्शींच्या व्हिडीओनुसार, विमान कमी उंचीवर एक कौशल्यपूर्ण कृती करताना अचानक खाली आले आणि वेगाने जमिनीवर आदळले, ज्यामुळे मोठा स्फोट होऊन आगीचे आणि धुराचे लोळ उठले. यात विंग कमांडर नमांश सियाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
