देशातील नोकऱ्यांमध्ये मागच्या काही काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची चिन्हे आहेत. यामध्येही आर्थिक क्षेत्रात नोकऱ्यांचा झपाट्याने विस्तार होत असल्याचे चित्र आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, भारतात येत्या ४ वर्षात आर्थिक क्षेत्रात तब्बल ९ लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाणिज्य शाखेचे शिक्षण घेणाऱ्यांना अनेक संधी मिळणार आहेत. यातही सर्वाधिक नोकऱ्या बंगळुरु, दिल्ली आणि मुंबई येथे निर्माण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय या शहरांमध्ये आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळू शकेल असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बंगळुरुमध्ये सर्वाधिक म्हणजे १२.६३ टक्के वेतनवाढ, त्याखालोखाल दिल्लीमध्ये १२.२६ तर पुण्यात ११.१४ टक्के वेतनवाढ मिळणार आहे. साधारणपणे हे वाढलेले वेतन लाखाच्या पुढे असल्याने या क्षेत्रातील लोकांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.

मात्र आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये इतर शहरांपेक्षा कमी वेतनवाढ होईल असेही यामध्ये म्हटले आहे. यामुळे वेतनवाढीचा चांगला परिणाम होईल. मासिक उत्पन्न वाढल्याने लोकांच्या जीवनशैलीत बदल होतील असेही नोंदविण्यात आले आहे. देशातील ९ शहरांमधील १७ सेक्टरमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आणि वरील आकडेवारी जाहीर करण्यात आली. आर्थिक क्षेत्रामध्ये बँकींग, विमा आणि इतर फायनान्सशी निगडीत नोकऱ्या यांचा समावेश आहे. यामध्येही आर्थिक क्षेत्रातील नोकरीचा अनुभव असणाऱ्यांना अधिक फायदा होणार आहे.