भारताचा शेजारी देश श्रीलंकेची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तिथे खाण्यापिण्याचा तुटवडा असून आर्थिक विवंचनेने हैराण झालेले लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. श्रीलंकेत अन्नधान्य महागाईचा दर ३० टक्क्यांवर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत सुंदर, समृद्ध जीवन जगणाऱ्या श्रीलंकेवर अचानक संकटाचा डोंगर कसा कोसळला, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.

या गंभीर संकटात श्रीलंका अडकण्यामागे चीनकडून घेतलेले कर्ज हे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यापूर्वी श्रीलंका सरकारने चढ्या व्याजदराने कर्ज घेऊन भरपूर गुंतवणूक केली पण त्यांना त्याचा परतावा मिळाला नाही. आता हेच कर्ज श्रीलंकेच्या संकटाचे प्रमुख कारण आहे. चीनच्या या डावपेचात अडकलेला श्रीलंका हा पहिला देश नाही. याआधीही भारताचे शेजारी देश पाकिस्तान, म्यानमार, मालदीव आणि बांगलादेश तसेच जगातील १६५ देश अशाप्रकारे कर्जबाजारी झाले आहेत.

भारतीय चलनाबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का? जाणून घ्या काही रंजक बाबी

संशोधन प्रयोगशाळेच्या एड डेटाच्या अहवालात असे म्हटले आहे की चीनने जगातील १६५ देशांमधील १३,४२७ प्रकल्पांमध्ये ८४३ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. ज्यासाठी चीनच्या ३०० हून अधिक सरकारी वित्त संस्था आणि बँकांनी कर्ज दिले आहे. यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, चीनने हे कर्ज फक्त गरीब देशांना दिले आहे. असे ४२ देश आहेत ज्यांनी चीनकडून घेतलेले एकूण कर्ज त्यांच्या जीडीपीच्या १० टक्क्यांहून अधिक झाले आहे.

श्रीलंकेतही अशीच परिस्थिती होती. २०२१ मध्ये श्रीलंकेचा जीडीपी सुमारे ८१ अब्ज डॉलर होता. तर श्रीलंकेवरील चीनचे कर्ज सुमारे ८ अब्ज डॉलर होते. तसेच, श्रीलंकेकडे एकूण ४५ अब्ज डॉलरचे इतर विदेशी कर्ज आहेत. पाकिस्तान, मालदीव, म्यानमार, लाओस, पापुआ न्यू गिनी, ब्रुनेई, कंबोडिया या देशांचाही या यादीत समावेश आहे.

भारतातील ‘या’ शहरात सुरु झालं HIV Positive कामगार असणारं अनोखं कॅफे; आशियातील पहिलाच प्रयोग

आयएमएफ, जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानवरील एकूण विदेशी कर्जापैकी २७.१ टक्के वाटा फक्त चीनचा आहे. त्याच वेळी, श्रीलंकेवर १७.७७ टक्के, मालदीववर २० टक्के, बांगलादेशवर ६.८१ टक्के आणि नेपाळवरील एकूण विदेशी कर्जापैकी ३.३९ टक्के कर्ज हे केवळ चीनचे आहे. संकटातून जात असलेल्या श्रीलंकेसमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे चीनकडून मिळालेल्या कर्जावर कोणतीही सवलत मिळत नाही.

चीनने श्रीलंकेला या संकटात एकटेच सोडले नाही, तर कर्ज फेडण्यातही चीन श्रीलंकेला सवलतही देत नाही. अशा परिस्थितीत महागडे कर्ज ही श्रीलंकेसाठी मोठी समस्या बनली आहे. एड डेटाच्या अहवालानुसार, चीनने इतर देशांना साधारणपणे ४.२ टक्के जास्त व्याजदराने कर्ज दिले आहे. तर जपान, जर्मनी, फ्रान्स ओईसीडी -एडीसीसारखे देश १.१ टक्के व्याजाने कर्ज देतात. याशिवाय चीनने कर्जाचा कालावधीही खूपच कमी ठेवला आहे. चीनने बहुतेक देशांना 10 वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज दिले आहे. दुसरीकडे, जपान, जर्मनी, फ्रान्स, ओईसीडी -एडीसीसारखे देश २८ वर्षांच्या कालावधीत कर्ज देतात.