कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दिल्लीचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भारती यांची पत्नी लिपिका मित्रा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी गुन्हा दाखल केला.
द्वारकानाथ पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), ४९८ (ए) (जोडीदाराबरोबर क्रूर वर्तणूक), आणि ३२३ (जखमी होण्यास कारणीभूत) या कलमांनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दक्षिण-पश्चिम विभागाचे पोलीस सहआयुक्त दिपेंद्र पाठक यांनी ही माहिती दिली. लिपिका मित्रा यांनी काही महिन्यापूर्वीच सोमनाथ भारती यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. मात्र, समुपदेशनाच्या साह्याने यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी दोघांना चारवेळा समोरासमोर बसविण्यातही आले होते. पण यानंतरही लिपिका मित्रा आपल्या तक्रारीवर ठाम राहिल्याने आणि त्यांनी पोलीसांकडेच सोमनाथ भारती यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केल्यामुळे अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने ७ जुलै रोजी सोमनाथ भारती यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.