कॅनडा अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर ‘तिरंगा’ असलेली पायपुसणी विक्रीला ठेवल्याचे प्रकरण शांत होत नाही तोच आता अमेरिकेच्या ऑनलाईन कंपन्यांनीही हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा प्रकार समोर आला आहे. या कंपन्यांनी बिअरच्या बाटलीवर ‘गणपती’ आणि बुटांवर ‘ओम’चा वापर केला आहे. या प्रकरणी अमेरिकेच्या दोन ऑनलाईन कंपन्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित उत्पादनांच्या विक्रीवर भारतात आणि शक्य असल्यास अमेरिकेतही बंदी घालण्यात यावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

काही महिन्यांपूर्वी कॅनडा अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर तिरंगा असलेली पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली होती. यावरून देशभरातून मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता. संबंधित ऑनलाईन कंपनीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत होती. या प्रकरणाची दखल घेऊन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संबंधित संकेतस्थळावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अॅमेझॉनने माफीही मागितली होती. हे प्रकरण शांत होत नाही तोच आता अमेरिकेच्या ‘यसवीवाईब’ आणि ‘लॉस्टकोस्ट’ या अमेरिकेच्या ऑनलाईन कंपन्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या बिअरच्या बाटलीवर गणेशाचे छायाचित्र, तर बुटांवर ‘ओम’चे छायाचित्र वापरले आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि ‘भारत स्काऊट अॅण्ड गाईड’चे आयुक्त नरेश कडयान यांनी दिल्लीतील प्रशांत विहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित ऑनलाईन कंपन्यांविरोधात गुन्हा नोंदवून घेतला आहे. हिंदू देवदेवतांचे चित्र असलेली उत्पादने विक्रीसाठी ठेवलेल्या अमेरिकेच्या दोन ऑनलाईन कंपन्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या उत्पादनांच्या विक्रीवर भारतात; तसेच शक्य असेल तर अमेरिकेत बंदी आणण्यात यावी, अशी मागणी नरेश कडयान यांनी ‘एएनआय’शी बोलताना केली आहे. ऑनलाईन कंपन्यांच्या या प्रकारामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. या संतापजनक प्रकाराबाबत परराष्ट्र मंत्रालयालाही पत्राद्वारे कळवण्यात आले आहे, असेही कडयान यांनी सांगितले.

दरम्यान, भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाची पायपुसणी संकेतस्थळावर विक्रीस ठेवल्याने टीकेला सामोरे जावे लागलेल्या अॅमेझॉनने भारत सरकारकडे स्पष्टीकरण दिले होते. भारताची राष्ट्रीय प्रतिके आणि चिन्हांचा उत्पादनावरील वापर यावरुन अॅमेझॉनकडून भारत सरकारला स्पष्टीकरण देण्यात आले. आम्ही आमच्या संकेतस्थळावरील उत्पादने तपासली आहेत. जगभरातील अॅमेझॉनच्या संकेतस्थळांवर भारतीय राष्ट्रध्वज आणि राष्ट्रीय चिन्हांचा अपमान होईल, असे उत्पादन असणार नाही. नियमांच्या विरोधात जाईल, अशी कोणतीही कृती अॅमेझॉनक़ून होणार नाही, असे स्पष्टीकरण अॅमेझॉनकडून देण्यात आले होते.