दिल्लीमधील उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासहित २१ ठिकाणी छापेमारी केली आहे. जवळपास दहा तासांपासून सीबीआय सिसोदियांच्या घरी तपास करत आहे. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याविरोधात सीबीआयनं मनीष सिसोदियांसोबत १५ आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये सिसोदियांना घोटाळ्यातील मुख्य आरोपी सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा- SFI नव्हे काँग्रेस कार्यकर्त्यांनीच महात्मा गांधींचा फोटो तोडला, राहुल गांधींच्या कार्यालयावरील हल्ला प्रकरणाला वेगळं वळण

सिसोदिया यांनी गुन्हेगारी कट आणि खात्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोपही सीबीआयने त्यांच्यावर केला आहे. सीबीआयनं दाखल केलेल्या एएफआयरमध्ये काही दारु कंपन्यांचाही समावेश आहे. त्यासोबत १५ जणांविरोधात आणि काही अज्ञात लोकांविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली सरकारच्या एक्साईज पॉलिसीच्या विरोधात तपास करण्याची शिफारस नायब राज्यपालांनी केली होती.

छापेमारीनंतर सिसोदियांचे ट्वीट

“सीबीआय आलेली असून त्यांचे स्वागत आहे. आम्ही ईमानदार आहोत. लाखो मुलांच्या भविष्य उभारणीचे काम आम्ही करत आहोत. जो चांगले काम करतो त्याला असाच त्रास दिला जातो. आपल्या देशाचे हे दुर्देव आहे. याच कारणामुळे आपल देश प्रथम क्रमांकावर नाही,” असे ट्वीट करत मनीष सिसोदिया यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.

तसेच, “सत्य लवकर समोर यावे म्हणून आम्ही सीबीआयला पूर्ण सहकार्य करू. माझ्यावर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. या कारवाईतूनही काहीही समोर येणार नाही. चांगले शिक्षण देण्याच्या आमच्या प्रयत्नांना कोणीही रोखू शकत नाही,” असेदेखील सिसोदिया म्हणाले.

हेही वाचा- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

सिसोदियांवरील कारवाईवर केजरीवालांची टीका

सिसोदिया यांच्याविरोधातील या कारवाईवर अरविंद केजरीवाल यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “दिल्लीमधील शिक्षण आणि आरोग्य सवेवर होत असलेल्या कामाची दखल जगभरात घेतली जात आहे. या कामाला यांना थांबवायचे आहे. याच कारणामुळे आरोग्य आणि शिक्षणमंत्र्यांच्या घरावर छापेमारी करण्यात येत आहे. ७५ वर्षातील सर्व चांगल्या कामांना थांबवण्याचे काम करण्यात येत आहे. याच कारणामुळे भारत पिछाडीवर आहे,” अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.