जम्मू-काश्मीरमधील काश्मीरमधील फुटीरतावादी नेते आणि तीनवेळा आमदार राहिलेले सय्यद अली शाह गिलानी यांचं १ सप्टेंबरला निधन झालं. जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरुवारी सकाळी शांततेत त्यांचा दफनविधी केला. पोलिसांनी गिलानी यांचं पार्थिव ताब्यात घेण्यापूर्वी ते पाकिस्तानी झेंड्यात गुंडाळलेलं असल्याचे काही व्हिडिओ आता समोर आले आहेत. याप्रकरणी दहशतवाद विरोधी कायदा आणि यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गिलानी यांच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून फोन आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. शनिवारी रात्री काश्मीरमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट आणि फोन सेवा पूर्ववत झाल्यानंतर हे व्हिडिओ समोर आले आहेत. खोऱ्यात मोबाईल इंटरनेट सेवा मात्र अद्यापही बंद आहे. तसेच लोकांनी एकत्र जमू नये, यासाठी पोलिसांनी निर्बंधही लागू केले आहेत.

एका व्हिडीओमध्ये गिलानी यांच्या पार्थिवाभोवती खूप लोक जमलेले दिसत आहेत. त्यामध्ये महिलांचं प्रमाण अधिक असून गिलानींच्या पार्थिवाभोवती पाकिस्तानी झेंडा गुंडाळलेला दिसत आहे. खोलीत प्रचंड गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू आहे. तसेच दरवाजावर धक्काबुक्की करत महिला जोरजोरात रडताना दिसताहेत. या खोलीत पोलीस देखील हजर होते. दरम्यान, गिलानी यांचा गुरुवारी पहाट होण्यापूर्वी दफनविधी करण्यात आला. तर, पोलिसांनी जबरदस्तीने मृतदेह उचलून नेला असून आम्हाला अंतिमविधीत सहभागी होऊ दिलं नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय.

“तर सर्व देशविरोधी कारवायांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असं जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितलं. तसेच “गिलानी यांच्या घरातील लोकांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि इतर पोलिसांसोबत गैरवर्तन केले आणि तेथे देशविरोधी घोषणाबाजी केली. तसेच सोशल मीडिया आणि फोन कॉलचा वापर करून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलंय. गिलानींच्या घरात सदस्य आणि इतर लोकांकडून अशा वर्तणुकीची आम्हाला अपेक्षा नव्हती. पोलीस नेहमीच गिलानी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होते,” असेही सिंह म्हणाले.