छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांविरोधात गुन्हा

ब्राह्मण समाजाविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोप

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल

ब्राह्मण समाजाविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोप

रायपूर : ब्राह्मण समाजाविरुद्ध कथित अपमानास्पद शेरेबाजी केल्याच्या आरोपाखाली छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्याविरुद्ध रायपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

‘सर्व ब्राह्मण समाज’ या संघटनेच्या तक्रारीच्या आधारे डी.डी. नगर पोलिसांनी शनिवारी उशिरा रात्री बघेल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. धर्म, वंश इ. आधारावर वेगवेगळ्या समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे यांसह इतर आरोपांखाली भादंविच्या विविध कलमांखाली हे प्रकरण नोंदवण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी अलीकडेच ब्राह्मण हे परकीय असल्याचे सांगून त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन लोकांना केले, तसेच ब्राह्मणांना आपल्या खेडय़ात प्रवेश करू देऊ नका असेही सांगितले, असे संघटनेने तक्रारीत म्हटले आहे. ब्राह्मणांना देशातून ‘घालवून द्या’ असेही आवाहन ते लोकांना करत असल्याचा आरोप त्यांनी बघेल यांच्यावर केला आहे.

यापूर्वीही मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी भगवान श्रीरामाविरुद्ध कथितरीत्या अपमानास्पद शेरेबाजी केली होती, असे तक्रारीत म्हटल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. उत्तर प्रदेशात एका कार्यक्रमात भाषण करताना नंदकुमार बघेल यांनी ही शेरेबाजी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान वडिलांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर, अशा शेरेबाजीमुळे आपल्याला दु:ख झाल्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले. आपल्या राजवटीत कुणीही कायद्यापेक्षा मोठा नसून, या प्रकरणी पोलीस योग्य ती कारवाई करतील असे ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fir registered against chhattisgarh cm s father for anti brahmin comments zws

ताज्या बातम्या