पीटीआय , मेक्सिको सिटी : Fire in Mexico City अमेरिकेच्या सीमेजवळ मेक्सिकोमध्ये निर्वासित केंद्रामधील एका वसतिगृहाला लागलेल्या आगीत ३९ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती मेक्सिको सरकारच्या वतीने देण्यात आली. सोमवारी रात्री उशिरा लागलेल्या या आगीमुळे काही तासांनंतर अग्निशमन दलाच्या गाडय़ा व रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या.
मेक्सिकोतील राष्ट्रीय निर्वासित संस्थेच्या म्हणण्यानुसार या दुर्घटनेत २९ जण जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. निर्वासितांच्या मदतीसाठी सरकारी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पाचारण करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
निर्वासितांकडूनच आग
या निर्वासित केंद्रातील काही निर्वासितांचे स्थलांतर केले जाणार होते. हे कळल्यानंतर निषेध म्हणून या निर्वासितांनी गाद्या पेटवून दिल्या. त्यामुळे ही आग लागल्याो मेक्सिकोच्या अध्यक्षंनी सांगितले. ही घटना दुर्दैवी असून अशा प्रकारे दुर्घटना होऊ शकेल, अशी कधी कल्पनाही केली नव्हती, असे मेक्सिकोचे अध्यक्ष लोपेझ ओब्राडोर म्हणाले.