Mexico : मेक्सिकोच्या सोनोरा राज्यामधील हर्मोसिलो शहरातील एका सुपरमार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना रविवारी घडली आहे. या घटनेत लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे मेक्सिकोत एकच खळबळ उडाली आहे.
मेक्सिकोमध्ये या आठवड्याच्या शेवटी एक उत्सव साजरा करण्यात येत असून हा एक पारंपारिक उत्सव आहे ज्यामध्ये प्रत्येक कुटुंबं त्यांच्या मृत प्रियजनांची आठवण काढत सण साजरा करतात. मात्र, सण साजरा करत असतानाच मेक्सिकोच्या हर्मोसिलो शहरातील एका सुपरमार्केटमध्ये भीषण आग लागली आणि या घटनेत तब्बल २३ जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.
या घटनेत १२ पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जेव्हा भीषण आग लागल्याची घटना घडली तेव्हा सुपरमार्केटमध्ये एकच गोंधळ आणि आरडाओरडा झाला. त्यानंतर काही जणांना या घटनेतून वाचवण्यात आलं. जेव्हा ही घटना घडली तेव्हा तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
सोनोरा राज्याचे गव्हर्नर अल्फोन्सो दुराझो यांनी सोशल मीडियावर एका व्हिडीओच्या माध्यमातून या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “दुर्घटनेची कारणे स्पष्ट करण्यासाठी मी सखोल आणि पारदर्शक चौकशीचे आदेश दिले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांप्रती माझी मनापासून संवेदना आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबियांना आणि जखमींना मदत करण्यासाठी मदत पथके पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.”
दरम्यान, सुपरमार्केटमध्ये अचानक लागलेल्या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जरी काही माध्यमांनी विद्युत बिघाडामुळे आग लागल्याचं कारण सांगितलं असलं तरी या संदर्भातील अधिक चौकशी करण्यात येत आहे. तसेच अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी सांगितलं की स्फोट झाला आहे की नाही याची चौकशी सुरू आहे.
