बुधवारी सायंकाळी राजधानी दिल्लीतील मुखर्जीनगर येथील एका तीन मजली मुलींच्या वसतिगृहाला (पेइंग गेस्ट) आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. बुधवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे.
अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं “संबंधित इमारतीत ३५ मुली राहत होत्या. त्या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. इमारतीच्या पायऱ्यांजवळ असलेल्या विद्युत बोर्डात सर्वप्रथम आग लागली आणि त्यानंतर वरच्या मजल्यापर्यंत आग पसरली. इमारतीला फक्त एकच जिना असल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला.”




या दुर्घटनेत किमान चार मुली जखमी झाल्या आहेत. संबंधित मुलींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, असंही अधिकाऱ्याने सांगितलं. आगीच्या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. आगीचे कारण आणि नुकसानीचा आकडा अद्याप समजू शकला नाही.