Fire in Gwalior hospital : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरातील एका सरकारी रुग्णालयात रविवारी पहाटे आग लागल्याची भीषण घटना समोर आली. या आगीच्या घटनेनंतर १९० हून अधिक रुग्णांना रुग्णालयातून वाचवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असेही अधिकार्यांनी सांगितले आहे.
नेमकं झालं काय?
ग्वाल्हेरच्या जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, कमला राजा रुग्णालयाती पहाटे १ च्या सुमारास स्त्रीरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) एअर कंडिशनरमध्ये आग लागली. १९० हून अधिक रुग्णांना ज्यामध्ये १३ आयसीयूमधील रुग्णांचा देखील समावेश होता, या आगीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि दुसऱ्या रुग्णालया हलवण्यात आले, असेही अधिकार्यांनी सांगितले.
कमला राजा रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याच्या जनसंपर्क विभागाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
आगीच्या घटनेची होणार चौकशी
रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षक आणि वॉर्ड बॉय यांनी खिडक्यांच्या काचा फोडून तात्काळ आयसीयूमध्ये भरती असलेल्या सर्व रुग्णांना बाहेर काढले आणि त्यांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे चौहान म्हणाल्या. आयसीयू आणि इतर वॉर्डमध्ये भरती होते ते सर्व रुग्ण सुरक्षित आहेत, तसेच या आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
आयसीयूमधील १३ रुग्णांना आणि रुग्णालयाच्या इतर वॉर्डमधील जवळपास १८० रुग्णांना बाहेर काढून मेडिकल कॉलेज कॅम्पसमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, असे निवेदनात म्हटले आहे.
रुग्णांची काळजी घेणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, “आग लागल्यानंतर रुग्णालयाचा परिसर धुराने भरला होता. कर्मचाऱ्यांनी तात्काळ सर्व रुग्णांना हलवण्यास सुरुवात केली. त्यावेळी काहीही दिसत नव्हते. सध्या आमचा रुग्ण व्यवस्थित आहे आणि त्याला नवीन ठिकाणी ठेवण्यात आले आहे.”