अमरावती : आंध्र प्रदेशच्या काकीनाडा जिल्ह्यात वेटालापालेम येथे एका फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात सुमारे २१ जणांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. स्फोटाची भीषणता इतकी प्रचंड होती की, मृतदेह शेजारील शेतात फेकले गेले. या स्फोटाचे नेमके कारण कळू शकलेले नाही. याबाबतचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जखमींना काकीनाडा येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये ९० ते १०० टक्के भाजलेल्या रुग्णांची संख्या सात असल्याचे रुग्णालयाच्या अधीक्षकांनी सांगितले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. या स्फोटाबद्दल मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दुख: व्यक्त केले आहे. आपल्या ‘एक्स’ वरील संदेशात त्यांनी या अपघातात अनेकांचा मृत्यू होणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून जखमींना तातडीची मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. आम्ही बचावकार्यावर लक्ष ठेवून आहोत तसेच पीडित कुटुंबांना मदत करू, असेही त्यांनी म्हटले आहे.
पर्यटनमंत्री के. दुर्गेश यांनी सांगितले की, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे घटनास्थळी भेट देण्याची शक्यता आहे. राज्यातील हा सर्वात मोठा स्फोट आहे. संपूर्ण तपशील अद्याप समोर आला नसला तरी यात कोणाच्याही वाचण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
