TMC Split : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. विशेषतः ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर पक्षातील अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यातच तृणमूल काँग्रेसच्या ५९ बंडखोर आमदारांच्या गटाला विधानसभेत मान्यता मिळाल्याने ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला आहे.

या घडामोडी सुरू असतानाच ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे टीएमसीचे नेते फिरहाद हकीम यांनी कोलकाता महापालिकेच्या महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम हे २०१८ पासून या पदावर होते. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

कुणाल घोष यांनी काय सांगितलं?

टीएमसीचे ज्येष्ठ नेते कुणाल घोष यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं की, “फिरहाद हकीम यांनी ममता बॅनर्जी यांच्या परवानगीने राजीनामा दिला आहे. फिरहाद हकीम यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे राजीनामा देण्याची विनंती केली होती. कारण राज्य सरकार महापालिका बरखास्त करत असल्याच्या हालचालींमुळे त्यांना सन्मानपूर्वक निरोप हवा होता. आतापर्यंत ममता बॅनर्जी यांनी परवानगी दिली नव्हती. मात्र, आज झालेल्या प्रशासकीय बैठकीनंतर हे स्पष्ट झालं की, महापालिका प्रभावीपणे बरखास्त करण्यात येणार असल्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांचा सन्मान व प्रतिष्ठा कायम राहावी यासाठी ममता बॅनर्जी यांनी फिरहाद हकीम यांना राजीनामा देण्याची परवानगी दिली.”

फिरहाद हकीम यांना ‘बॉबी’ नावानेही ओळखलं जातं. फिरहाद हकीम हे ममता बॅनर्जी यांचे निकटचे सहकारी आहेत. ते कोलकाता येथील पोर्ट विधानसभा मतदारसंघातून तब्बल चार वेळा आमदार राहिलेले आहेत. दरम्यान, आज विधानसभा अध्यक्षांनी टीएमसीच्या बंडखोर गटाचे नेते ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिल्यानंतर आणि तृणमूल पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असताना आज फिरहाद हकीम यांनीही कोलकाता महापालिकेच्या महापौरपदाचा राजीनामा दिल्यामुळे टीएमसी पक्षात खळबळ उडाली आहे.

ममता बॅनर्जींना धक्का; ५९ बंडखोर आमदारांच्या गटाला विधानसभेत मान्यता

तृणमूल काँग्रेसमधून निलंबित केलेले आमदार संदीपान साहा आणि आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांनी बुधवारी पश्चिम बंगाल विधानसभेत त्यांना ५० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. तसेच तृणमूल काँग्रेसमधील गटाचे आपण नेते असल्याचा दावा करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद आपल्याला मिळावं अशी मागणी ऋतब्रता बॅनर्जी यांनी केली होती. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार ऋतब्रता बॅनर्जी हे आता बंगालचे नवे विरोधी पक्षनेते बनले आहेत.

तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर थेट तृणमूलच्या नेतृत्वाला आव्हान देत ऋतब्रता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला होता. तसेच आपल्याला ५९ आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांना दिलं होतं, त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी ५९ बंडखोर आमदारांच्या गटाला विधानसभेत मंजुरी देत ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिल्याने ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.

ऋतब्रता बॅनर्जी कोण आहेत?

पश्चिम बंगालमधील उलुबेरिया-पूर्वा विधानसभेचे आमदार ऋतब्रता बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभेचे खासदार होते. नुकत्याच लागलेल्या विधानसभेच्या निकालानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. “पक्षाने आपला पराभव स्वीकारलेला नाही. आम्ही जेव्हा निकालानंतर बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गेलो तेव्हा आम्हाला अभिषेक बॅनर्जी यांच्या कामगिरीसाठी उभे राहून वंदन करण्यास सांगितले”, अशी टीका ऋतब्रता बॅनर्जी यांनी केली होती.

Ritabrata Banerjee leader of opposition
ममता बॅनर्जींना मोठा धक्का? ५९ बंडखोर आमदारांच्या गटाला विधानसभेत मंजुरी, ऋतब्रता बॅनर्जी बंगालचे नवे विरोधी पक्षनेते

ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षात फूट पाडणारे ऋतब्रता बॅनर्जी यांनी आपल्या विद्यार्थी राजकीय कारकिर्दीची सुरुवात डाव्या विचारसरणीच्या एसएफआय संघटनेतून केली होती. त्यानंतर २०२० मध्ये ते टीएमसीमध्ये सामील झाले होते. ते टीएमसी कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि २०१४ मध्ये राज्यसभेवर निवडून आले होते. २०२४ मध्ये ते दुसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार झाले होते. आता २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत ते उलुबेरिया पूर्वा मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता याच ऋतब्रता बॅनर्जी हे टीएमसीच्या ५९ बंडखोर आमदारांच्या गटाचं नेतृत्व करत आहेत.