शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास नागालँडमध्ये झालेल्या गोळीबारात १३ सामान्य नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागालँडच्या मोन जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सकाळी मृतांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला, तेव्हा हा प्रकार समोर आला. या प्रकारामुळे नागालँडमध्ये खळबळ उडाली असून मुख्यमंत्री नैफियू रिओ यांनी तातडीने घडलेल्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आसाम रायफल्सच्या सेक्युरिटी ऑपरेशनमध्ये या नागरिकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.

नेमकं काय घडलं?

नागालँडच्या मोन जिल्ह्यातल्या तिनागालँडच्या मोन जिल्ह्यातल्या तिरु या गावात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटिंग गावातून काही लोक एका पिकअप व्हॅनमधून घरी परतण्यासाठी रात्रीच्या सुमारास निघाले. मात्र, ते घरी पोहोचलेच नाहीत. सकाळपर्यंत ते पोहोचले नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला. तेव्हा तिरू गावानजीक पिकअप व्हॅनमध्ये ११ जणांचे मृतदेह आढळून आले. या घटनेत काही जखमी देखील असल्याचं सांगितलं जात असून मृतांचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी पोलिया घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी पोलिसांच्या दोन गाड्या पेटवून टाकल्या. दहशतवादी असल्याच्या संशयावरून ही कारवाई झाल्याचं देखील बोललं जात आहे. यासंदर्भात पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील ट्वीट करून मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन केलं आहे.

“मोन जिल्ह्यात सामान्य नागरिकांच्या मृत्यूचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. या प्रकरणाचा उच्चस्तरीय एसआयटी चौकशी करेल. कायद्यानुसार गुन्हेगारांना शिक्षा होईल. माझं नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी शांतता राखावी”, असं ट्वीट मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी केलं आहे.

अमित शाह यांची संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान, या प्रकारावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. “नागालँडच्या मोन जिल्ह्यात घडलेला प्रकार अत्यंत संतापजनक आहे. माझ्या भावना मृतांच्या नातेवाईकांसोबत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नेमलेली उच्चस्तरीय एसआयटी सखोल तपास करेल आणि मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळेल”, असं ट्वीट अमित शाह यांनी केलं आहे.