करोनाचं थैमान! देशात आढळला दुसऱ्यांदा करोना झालेला रुग्ण; रुग्णालयानं केला दावा

महिलेला जुलैमध्ये झाला होता करोना

संग्रहित छायाचित्र

देशात करोनानं अक्षरशः थैमान घातलं आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी निर्बंध सैल केले जात असतानाच रुग्णसंख्येत काळजीत भर टाकणारी वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून देशात ८० ते ९० हजारांच्या दरम्यान रुग्ण सापडत असून, आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. देशात दुसऱ्यांदा करोनाचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे नागरिकांनी करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

बंगळुरूतील एका खासगी रुग्णालयानं दुसऱ्यांदा करोना झालेला रुग्ण आढळून आल्याचा दावा केला आहे. बंगळुरूतील हा पहिलाच रुग्ण असल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे. बंगळुरूतील फोर्टीस रुग्णालयानं दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार २७ वर्षीय महिलेला दुसऱ्यांदा करोनाचा संसर्ग झाला आहे.

दुसऱ्यांदा करोना पॉझिटिव्ह आढळून आलेली महिलेमध्ये जुलैमध्ये करोनाची सौम्य लक्षणं आढळून आली होती. महिलेला ताप आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर पहिला उपचाराच्या साहाय्यानं करोनातून बरी झाली. करोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर पहिलेला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. मात्र, एका महिन्याच्या कालावधीनंतर त्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, पुन्हा करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे, असा दावा रुग्णालयानं केला आहे.

यापूर्वी हॉगकाँगमध्ये दुसऱ्यांदा करोना झालेला पहिला रुग्ण आढळून आला होता. हॉगकाँग विद्यापीठानं हा दावा केला होता. हॉगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी सांगितलं होतं की, “हॉगकाँगमधील एका व्यक्तीला दुसऱ्यांदा करोना झाल्याचं सिद्ध झालं आहे. ही नोंदणीकृत पहिलीच घटना आहे. ३३ वर्षीय आयटी कर्मचाऱ्याला एप्रिलमध्ये करोना झाला होता. त्यातून बरं झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. त्या कर्मचाऱ्याला ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातील स्पेनमधून परतल्यानंतर पुन्हा करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. करोना चाचणी केल्यानंतर हे समोर आलं,” असं संशोधकांनी म्हटलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: First covid 19 reinfection reported in bengaluru claims hospital bmh