वेल डन! सहा आठवडयात बनवला पहिला ‘मेड इन इंडिया’ COVID-19 टेस्ट किट

पुणे स्थित मॉलिक्युलर डायग्नोसिस कंपनी मायलॅबने COVID-19 च्या चाचणीसाठी टेस्ट किटची निर्मिती केली आहे.

पुणे स्थित मॉलिक्युलर डायग्नोसिस कंपनी मायलॅबने COVID-19 च्या चाचणीसाठी टेस्ट किटची निर्मिती केली आहे. मॉलिक्युलर डायग्नोसिस किटस बनवण्यात पारंगत असलेल्या या कंपनीने करोना व्हायरसच्या चाचणीसाठी पहिला मेड इन इंडिया टेस्ट किट बनवला आहे. विक्रमी सहा आठडयांमध्ये कंपनीने हा किट तयार केला आहे.

Covid-19 पीसीआर किटचे उत्पादन करण्यासाठी मायलॅब या भारतातील खासगी कंपनीला सरकारकडून आवश्यक व्यावसायिक परवानगी मिळाली आहे. सध्या बाजारात जे किट उपलब्ध आहेत. त्यापेक्षा या किटची किंमत कमी असेल. अत्याधुनिक पद्धतीने बनवण्यात आलेल्या या किटमुळे करोना चाचणीचा वेळ कमी होणार असल्याचा दावा माय लॅबने केला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

“मेक इन इंडियावर भर देत राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने COVID- 19 चा किट बनवण्यात आला आहे. हा किट बनवताना जागतिक आरोग्य संघटना आणि सीडीसीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात आले आहे. विक्रमी वेळेत आम्ही हा किट बनवला” असे मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल यांनी बिझनेस टुडेशी बोलताना सांगितले.

“सीडीएससीओ/एफडीए या नियामंक संस्थांनी तात्काळ उचललेली पावले, आयसीएमआर, एनआयव्ही, केंद्र आणि राज्य सरकारांनी या इमर्जन्सीच्या काळात केलेले सहकार्य खरोखर कौतुकास्पद आहे” असे रावल म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: First made in india covid 19 test kit by mylab gets commercial approval dmp

ताज्या बातम्या