राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सोमवारी पाटणा न्यायालयात रेल्वे घातपात प्रकरणातील पहिले आरोपपत्र सादर करण्यात आले. या आरोपपत्रात एकूण नऊ जणांच्या नावाचा उल्लेख असून यापैकी दोन व्यक्ती नेपाळी आहेत. ऑक्टोबर २०१६ मध्ये बिहारच्या घोडासहन रेल्वे स्थानकानजीक रेल्वे रूळ उडवण्याचा कट रचल्याप्रकरणी या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय, एनआयए सध्या कानपूर व आंध्र प्रदेशच्या कुनेरू येथे झालेल्या रेल्वे अपघातांचीही चौकशी करत आहे. आरोपपत्रात नमूद केल्याप्रमाणे बिहारमधील कटातील एका आरोपीचा कानपूर येथील रेल्वे घातापातामध्येही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. मात्र, आपल्याविरुद्ध एनआयएकडे कोणताही पुरावा नसल्याचे या आरोपीचे म्हणणे आहे. आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या आरोपींमध्ये उमाशंकर पटेल, गजेंद्र शर्मा, राकेश कुमार यादव, रंजय साह, मुकेश यादव, मोतीलाल पासवान , अरूण राम, ब्रज किशोर आणि शमशूल हुडा यांचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी रेल्वे दुर्घटनांमागे आयएसआय़ या पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेचा हात असल्याचा दावा बिहार पोलिसांनी केला होता. बिहार पोलिसांनी केलेल्या दाव्यात तथ्य असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्यामुळे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) चौकशी सुरू केली होती. घोडासहन येथे रेल्वे रुळावर कुकर बॉम्ब ठेवून पेसेंजर गाडी उडवण्याचा कट रचला होता. मात्र, तो अपयशी ठरला होता. १ ऑक्टोबर २०१६ रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. आयएसआयच्या एजंटने दोघांना रेल्वे गाडी बॉम्बने उडवण्यासाठी ‘सुपारी’ दिली होती. त्यासाठी ३ लाख रुपये दिले गेले होते. मात्र, ऐनवेळी बॉम्ब फुटला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, असे पोलिसांनी सांगितले होते. रेल्वेगाडी उडवण्याचा कट अपय़शी ठरल्यानंतर एजंटने दोघांनाही ठार केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. हे दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती. पण त्यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. या हत्यांमागे आयएसआयचा हात असल्याचे चौकशीत समोर आले होते.

त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात कानपूर रेल्वे अपघाताचा कट रचणारा आणि आयएसआय या पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणेचा एजंट शमशूल हुडा याला नेपाळ पोलिसांनी अटक केली होती. याशिवाय, बिहार पोलिसांनी उमाशंकर पटेल, मोतिलाल पासवान आणि मुकेश यादव या तीन गुन्हेगारांना भारत – नेपाळ सीमारेषेवरील मोतीहारी या भागातून अटक केली होती. हे तिघे आयएसआयचे एजंट असल्याची माहिती तपासातून उघड झाली होती. या तिघांनी कानपूर रेल्वे अपघातामागे आयएसआयचा हात असल्याची माहिती दिली होती. एनआयएने केलेल्या तपासातही या दाव्यामध्ये तथ्य आढळले होते.