FIR on Congress Leader Raja Pateriya: काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेश सरकारचे माजी मंत्री राजा पटेरियांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हत्येचं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर राजा पटेरियांनी पहिली प्रतिक्रिया देत आपल्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढल्याची सारवासारव केली आहे.
पटेरियांचा एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत आहे. यात व्हिडीओत पटेरिया कथितपणे म्हणत आहेत की, संविधान वाचवायचं असेल, तर मोदींची हत्या (Murder of Narendra Modi) करण्यासाठी तयार राहा. मात्र, या व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल होताच पटेरियांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. माझा हत्या किंवा हिंसेत विश्वास नाही. मला माझ्या वक्तव्यातून मोदींचा पराभव करावा लागेल असं सांगायचं होतं.”
राजा पटेरिया नेमकं काय म्हणाले होते?
जर आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार राहिलं पाहिजे असं राजा पटेरिया म्हणाले आहेत.
व्हिडीओ पाहा :
“नरेंद्र मोदी निवडणूक संपवतील; धर्म, जात, भाषेच्या आधारे सर्वाचं विभाजन करतील. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांना धोका आहे. जर आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार राहिलं पाहिजे,” असं ते म्हणाले. दरम्यान यानंतर त्यांनी हत्या म्हणजे पराभव असं सांगत सावरण्याचाही प्रयत्न केला.
हे वक्तव्य म्हणजे षडयंत्र – शिवराज सिंह चौहान
राजा पटेरिया यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या वक्तव्याला षडयंत्र म्हणून पाहिलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं. शिवराज सिंह म्हणाले, “राजा पटेरिया यांनी केवळ वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही, तर हे एक षडयंत्र आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्याची हत्या करावी लागेल अशा शब्दांचा वापर का? ते या वक्तव्यातून अगदी स्पष्टपणे लोकांना भडकावत आहेत. याचे परिणाम किती भयानक होऊ शकतात याचा कधी विचार केलाय का?”