पटकन भूक भागवायची म्हटलं की, वडापाव ते इडली पर्यंतचे अनेक पदार्थ आपल्या डोळ्यांसमोर येतात. याच पंक्तीत भाव खाऊन जातो तो समोसा. बॉलिवूड चित्रपटांमध्येही समोशाचा उल्लेख अनेकदा पाहायला मिळाला, इतकंच काय राजकिय घोषणाबाजीतही समोशाचा वापर केला गेलाय. जबतक रहेगा समोसे में आलू, बिहार में रहेगा लालू हे त्याचं उत्तम उदाहरण. मध्य आशियामध्ये जन्मलेल्या समोशाला भारतात सुरुवातीपासूनच वड्याच्या जोडीला स्थान मिळाले. हाच समोसा आता केवळ भारतात नाही तर परदेशातही तेवढाच प्रसीद्ध झालाय.

ब्रिटनमध्ये समोसा नागरिकांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय. समोशाची वाढती लोकप्रियता पाहून आता ब्रिटनमध्ये नॅशनल समोसा वीक साजरा केला जाणार आहे. भारतीयांची संख्या ब्रिटनच्या लिसेस्टर शहरात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे 9 ते 13 एप्रिल दरम्यान येथे नॅशनल समोसा वीक साजरा केला जाणार आहे. दक्षिण आशियातील पदार्थांचा व संस्कृतीचा प्रचार-प्रसार व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. स्थानिक पोलीस आणि सामाजिक संस्थांनी हे अभियान सुरू केलंय.

आम्ही राष्ट्रीय खान-पान कार्यक्रम आयोजित करत आहोत. यामध्ये बर्गरपासून बीअरपर्यंतचा समावेश आहे, मग समोसा का नको. गेल्या काही वर्षांमध्ये समोश्याची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. ब्रिटनच्या नागरिकांनी समोशाची चव चाखावी किंवा स्वतः समोसा बनवावा यासाठी आम्ही प्रोत्साहन देणार आहोत. यामधून मिळणारे पैसे सामाजिक उपक्रमांसाठी दान केले जाणार आहेत. समोसा खाणं म्हणजे चहा किंवा केक खाण्याप्रमाणे आहे असं लिसेस्टर करी अवार्डचे संस्थापक रोमेल गुलजार म्हणाले.