Pakistan Army On Kargil War : कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याची भूमिका होती, अशी सार्वजनिक कबुली पाकिस्तानी आर्मीकडून देण्यात आली आहे. संरक्षणदिनाच्या कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी यासंदर्भात विधान केलं आहे. १९६५ चं युद्ध असो, १९७१ चं युद्ध असो किंवा १९९९ चं कारगील युद्ध असो, देशासाठी आणि इस्लामसाठी पाकिस्तानी सैनिक शहीद झाले आहेत, असे ते म्हणाले. त्यांच्या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणाले लष्कर प्रमुख असीम मुनीर?

“पाकिस्तानात शूरवीर सैनिकांचा एक समूह आहे, जो पाकिस्तानसाठी काहीही करायला तयार आहे. १९४८, १९६५, १९७१ युद्ध असो किंवा १९९९ चं कारगिल युद्ध असो, देशातील हजारो जवानांनी देश आणि इस्लामसाठी बलिदान दिले आहे”, असं असीम मुनीर म्हणाले. या विधानाद्वारे पाकिस्तानी आर्मीने २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच कारगिल युद्धातील भूमिका मान्य केली आहे. यापूर्वी या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचा सहभाग नसून हा मुजाहिद्दीन यांनी केलेला हल्ला होता, अशी भूमिका पाकिस्तानने मांडली होती.

हेही वाचा – Narendra Modi in Kargil Vijay Diwas : “पाकिस्तानने आपल्या इतिहासातून…”; कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधानांचा दहशतवाद्यांना इशारा!

कारगिलचे युद्ध काय होतं?

१९९९ मध्ये कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवला होता. मात्र, सुरुवातीला हे पाकिस्तानी सैनिक नसून मुजाहिद्दीन आहेत, अशी भूमिका पाकिस्ताने मांडली होती. त्यानंतर कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोकण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑप्रेशन विजयची सुरुवात केली. तीन महिने चाललेल्या या युद्धात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता.

हेही वाचा – Kargil War Female Heroes : कारगिल युद्धातील महिला योद्धा! पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांनी कसा राखला होता जखमी सैनिकांचा गड?

कारगिल युद्धात ५२७ भारतीयांना गमवावे लागले होते प्राण

यादरम्यान, संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. भारतीय लष्कराच्या तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने या प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ताब्यात घेतला होता. ५ जुलै रोजी शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली होती. या युद्धामध्ये ५२७ भारतीयांना प्राण गमवावे लागले, तर पाकिस्तानमधील मृतांचा आकडा ४५० इतका होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First time pakistani army chief asim munir admits role in kargil war spb
Show comments