गगनयान मोहीम डिसेंबरमध्ये

कोविड १९ टाळेबंदीमुळे ही अवकाश मोहिम मागे पडत चालली होती, त्याला आता गती देण्यात येत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

बेंगळुरू : भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे मानवरहित गगनयान डिसेंबरमध्ये अवकाशात झेपावणार आहे. मानवी अवकाश मोहिमेची ही पूर्वतयारी असून कोविड १९ टाळेबंदीमुळे ही अवकाश मोहिम मागे पडत चालली होती, त्याला आता गती देण्यात येत आहे.

टाळेबंदीमुळे अवकाशयानासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची वाहतूक विस्कळीत झाली होती. गगनयान योजनेत एकूण दोन मानवरहित उड्डाणे होणार असून नंतर भारतीय व्यक्तींना अवकाशाची सफर करण्याची संधी मिळणार आहे. करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने या मोहिमेला मोठा फटका दिल्याचे बेंगळुरूत मुख्यालय असलेल्या इस्रो या संस्थेने म्हटले आहे. अवकाशयानासाठी लागणारी यंत्रसामग्री देशाच्या विविध भागातून गोळा करण्यात येत होती, पण कोविड टाळेबंदीमुळे त्यावर विपरित परिणाम झाला होता. यानाची रचना, विश्लेषण व दस्तावेजीकरण इस्रोने केले असून  यंत्रसामग्री देशी उद्योग पुरवित आहेत.

केंद्रीय अवकाश राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी फेब्रुवारीत  म्हटले होते, की यावर्षी डिसेंबरमध्ये  पहिले मानवरहित अवकाशयान उड्डाण करेल. दुसरे मानवरहित यान २०२२—२३ मध्ये उड्डाण करील व त्यानंतर मानवी अवकाश मोहीम होईल.

त्यात गगनयानातून भारतीयांना अवकाशात पाठवण्यात येईल. जीएसएलव्ही एमके ३ हा प्रक्षेपक या योजनेसाठी निश्चित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात या मोहिमेची घोषणा केली होती. मानवी अवकाश मोहीम भारताच्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी अगोदर म्हणजे १५ ऑगस्ट २०२२ अगोदर व्हावी असे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. इस्रोतील वैज्ञानिक व तंत्रज्ञ जास्त काम करून लक्ष्य गाठण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील. गगनयानची काही कामे पूर्ण झाली असून गेले दशकभर या योजनेवर काम चालूच होते, फक्त त्याची घोषणा तीन वर्षांंपूर्वी करण्यात आली. इस्रो या मोहिमेत फ्रान्स, रशिया, अमेरिका यांच्या अवकाश संस्थांची मदत घेत असून काही घटक हे देश पुरवणार आहेत. त्यामुळे फार काळ वाया घालवून चालणार नाही पण भारतात उद्योग बंद आहेत, त्याचा फटका यंत्रसामग्री पुरवठय़ाला बसत असून तरीही लक्ष्य पूर्ण करण्याची आम्ही तयारी करू असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले,की इस्रो मानवी मोहिमेचे उद्दिष्ट पुढील वर्षी ऑगस्टमध्ये पूर्ण करू शकेल की नाही याबाबत मात्र साशंकता आहे. तसे वचन देणे कठीण आहे पण त्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: First uncrewed mission of gaganyaan in december zws

ताज्या बातम्या