Punjab Crime News Classroom shooting: वर्गातच मैत्रिणीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली, त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील एका विधी महाविद्यालयात सोमवारी (०९ फेब्रुवारी) सकाळी ही घटना घडली. दोघेही प्रथम वर्षात शिक्षण घेत होते. या घटनेचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दोघांची ओळख पटली

संदीप कौर (रा. नौशेहरा पन्नूआन) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर, प्रिन्स राज (रा. मल्लियन, जालंधर) असे स्वतःवर गोळी झाडून घेतलेल्या मुलाचे नाव आहे. प्रिन्स याचाही यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी वर्गात ही घटना घडली.

व्हिडिओ काय दिसतंय?

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, सकाळी सव्वा नऊ वाजता प्रिन्स राज वर्गात आला. प्रिन्स संदीपच्या जवळ गेला. संदीप त्याच्यापासून दूर गेल्याचे व्हिडिओत दिसत आहे, यानंतर राज तिच्या मागे गेला. वर्गातील दुसरा एक विद्यार्थी मध्यस्थी करताना दिसत आहे. आणखी एक विद्यार्थी या व्हिडिओत हसताना दिसत आहे. संदिप कौर अखेरच्या बेंचवर बसली तिच्या पुढे प्रिन्स बसल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

अचानक काय झालं आणि गोळी झाडली?

संदीप कौर जागेवर उभी झाल्यानंतर प्रिन्स देखील जागेवर उभा राहतो आणि खिशातून पिस्तूल बाहेर काढतो. प्रिन्सने क्षणाचाही विचार न करता संदीपच्या डोक्यात गोळी झाडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यानंतर प्रिन्स स्वत:वर देखील गोळी झाडून घेतो. यात संदीपचा जागेवरच मृत्यू झाला. संशयित प्रिन्सचा देखील यात मृत्यू झाल्याची माहिती आहे.

पोलिस घेतायेत कारणाचा शोध

घटना घडल्यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थी घाबरुन बाहेर जातात, असे व्हिडिओत दिसत आहे. प्रिन्स राजने संदीपचा खून का केला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कारणाचा शोध घेण्यासाठी तपास केला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, या घटनेमुळे महाविद्यालयातील सर्वानाच मोठा धक्का बसला आहे.