अफगाणिस्तानवरुन पाकिस्तानमध्ये गृहकलह; लष्कर आणि ISI आमने-सामने

तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये ताबा मिळवल्यानंतर यावरुन पाकिस्तानमध्ये लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेत शीतयुद्ध निर्माण झाल्याचं दिसत आहे

Talibani, Afghanistan, ISI,
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद सध्या आमने-सामने आले आहेत.

तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये ताबा मिळवल्यानंतर यावरुन पाकिस्तानमध्ये लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेत शीतयुद्ध निर्माण झाल्याचं दिसत आहे. अफगाणिस्तानवर आपलं नियंत्रण राहावं यासाठी लष्कर आणि आयएसआयमध्ये चढाओढ सुरु आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद सध्या आमने-सामने आले आहेत.

इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हा वाद इतका टोकाला गेला आहे की पाकिस्तानचे लष्कर प्रमुख हमीद यांना त्यांच्या पदावरुन हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र गुप्तचर यंत्रणेचा प्रभाव पाहता त्यांना यामध्ये यश आलेलं नाही.

“गेल्या अनेक वर्षांपासून आयएसआयने तालिबान्यांची काळजी घेतली असून त्यांना पोसलं आहे. तसंच अफगाणिस्तानात आपल्या कामांसाठी, ऑपरेशन्ससाठी त्यांचा वापर केला आहे. आता जेव्हा अफगाणिस्तानात तालिबान सरकारमध्ये आहे तेव्हा पाकिस्तानी लष्कर तिथे आपला प्रभाव ठेवण्यासाठी तसंच तेथील निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र याला आयएसआयचा विरोध आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आयएसआयचे तालिबानी नेत्यांशी चांगले संबंध आहेत. यामध्ये विविध गटांचाही समावेश आहे. अफगाणिस्तान सरकारमध्ये स्थान मिळालेला हक्कानी गटदेखील यामध्ये आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानात आयएसआयचे लोक असून त्यांच्याकडे शस्त्रसाठादेखील आहे. तसंच काही महत्वाचे लोक त्यांच्या संपर्कात आहेत.

तालिबानच्या अनेक दहशतवाद्यांनी अमेरिकेविरोधात लढताना आयएसआयच्या पेशावर आणि क्वेट्टामधील सुरक्षित जागांचा आश्रय घेतला होता. दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा आपला अजेंडा तिथे राबवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण फैज हमीद यांना हे मान्य नसून अडथळा आणत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान सरकारमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी पाकिस्तानकडून सुरु असलेल्या प्रयत्नांमुळे तालिबानमध्येही वाद निर्माण झाला आहे. आयएसआयमुळे तालिबानला इतर देशांबद्दल घेतलेल्या प्रत्येक निर्णयात अडथळा येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आयएसआयला अफगाणिस्तानला पाश्चिमात्य देशांमधून मिळणाऱ्या मदत आणि पैशांमध्ये वाटा हवा आहे.

पाकिस्तानने नेहमीच अफगाणिस्तानला बी टीम म्हणून ग्राह्य धरलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय लष्कराविरोधातील कारवायांसाठीही त्यांचा वापर केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fissure widens between pak army and isi chiefs over control in afghanistan sgy