Bengaluru Creche Child Abuse Case: कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आई आणि वडील दोघेही नोकरीवर असल्यामुळे लहान मुलांना पाळणाघरात ठेवण्याचा अनेकांचा कल असतो. खासकरून शहरांमध्ये कामावर जाणारे पालक आपल्या चिमुकल्यांना पाळणाघरात ठेवतात. इथे मुलांची योग्य काळजी घेतली जाईल, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र दिवसेंदिवस पाळणाघरातील भीषण परिस्थिती समोर येत आहे. देशातील अनेक शहरातील पाळणाघरात कर्मचाऱ्यांकडून लहानग्यांना अमानुष वागणूक दिल्याचे व्हिडीओ अधूनमधून व्हायरल होत असतात. सध्या बंगळुरूच्या केपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसच्या संकुलातील पाळणाघराचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे.
आयटी कंपनीच्या संकुलात असणाऱ्या या पाळणाघरात अनेक कर्मचारी आपली लहान मुले ठेवतात. पाळणाघरातील कर्मचाऱ्यांनी या मुलांना शारीरिक इजा करत त्यांच्यावर अमानुष अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी पाच कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
या पाळणाघरात दोन वर्षांच्या लहान मुलांना शिक्षा करण्यासाठी फ्रंट-लोडिंग असलेल्या वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये बसविले गेले. काहींना शौचालयात कोंडून ठेवले जात होते. तर काही मुलांच्या तोंडात टॉयलेट जेट स्प्रेने पाणी मारले गेले, असा आरोप करण्यात येत आहे. या आरोपाशी संबंधित काही व्हिडीओ समोर आल्यानंतर बंगळुरूच्या आयटी वर्तुळात संतापाची लाट पसरली आहे.
जिल्हा बाल संरक्षण युनिटमधील विधी अधिकारी तिलकेश कुमार यांनी केलेल्या तक्रारीनंतर २९ जून रोजी एचएएल पोलीस ठाण्यात मुलांवर क्रूरता केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आला. केपजेमिनीच्या ब्रुकफील्ड कॅम्पसमध्ये असलेल्या शिशु संगोपन केंद्रात काम करणाऱ्या मंजुळा, विजयलक्ष्मी, भवानी, सिंधू आणि बिंदू या काळजीवाहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Absolute Horror ! Toddlers who were left at a daycare facility in Bengaluru's Capgemini Technology Services office were allegedly subjected to physical abuse, punished by locking them in bathrooms, faucets sprayed on thier faces and much more. FIR registered, investigation on. pic.twitter.com/CbnGcdcAUs
— Deepak Bopanna (@dpkBopanna) July 1, 2026
व्हिडीओमध्ये काय दिसले?
तिलकेश कुमार यांनी सांगितले की, त्यांना व्हॉट्सअॅपवर मुलांच्या रडण्याचे आणि त्यांच्यावर अत्याचार होत असल्याचे व्हिडीओ प्राप्त झाले. तक्रारीनुसार, ही घटना २५ जून रोजी उघडकीस आली. तिलकेश कुमार यांनी याबद्दलची चौकशी केली असता पाळणाघरातील कर्मचाऱ्यांनीच अत्याचार केल्याची माहिती त्यांना मिळाली.
लहान मुलांची काळजी घेण्याऐवजी आरोपींनी मुलांवरच अत्याचार केले. रडणाऱ्या मुलांना घाबरवण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये टाकले, शौचालयात त्यांना कोंडून ठेवण्यात आले आणि इतर प्रकारे मुलांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला.
पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, ही लहान मुले आयटी संकुलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आहेत. ऑफिसला जात असताना अनेकजण मुलांना इथे सोडून जात असत. पाळणाघरातील महिला ज्याप्रकारे मुलांना हाताळत आहेत, ते पाहून पालकांना मोठा धक्का बसला आहे.
सदर घटना उघडकीस आल्यानंतर केपजेमिनीने पाळणाघराची सुविधा तात्पुरती बंद करण्याची घोषणा केली. आपल्या निवेदनात कंपनीने म्हटले की, आपले कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य, सुरक्षा आणि कल्याण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही पोलिसांशी सहकार्य करत आहोत. खबरदारी म्हणून आम्ही बंगळुरूच्या कॅम्पसमधील पाळणाघर सुविधा तात्पुरती बंद करत आहोत.
