कर्नलची पत्नी आणि मुलाचाही मृत्यू

मणिपूरमध्ये शनिवारी सकाळी आसाम रायफल्सच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी आणि चार जवान शहीद झाले. या हल्ल्यात कर्नल त्रिपाठी यांची पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला. 

४६ आसाम रायफल्सच्या खुगा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी शनिवारी सकाळी एका लष्करी छावणीवर गेले होते. तेथून परतताना सकाळी १०च्या सुमारास संशयित दहशतवाद्यांनी त्यांच्या ताफ्यावर म्यानमार सीमेजवळच्या चुराचांदपूर जिल्ह्यातील शेखन गावानजीक हल्ला केला. दहशतवाद्यांनी ‘आयईडी’ स्फोट घडवून आणल्यानंतर बेछूट गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल ‘आसाम रायफल्स’च्या जवानांनीही गोळीबार केला. या वेळी झालेल्या धुमश्चक्रीत कमांडिंग ऑफिसर कर्नल त्रिपाठी (४१), त्यांची पत्नी अनुजा (३६) आणि सहा वर्षांचा मुलगा अबीर यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर चार जवानही दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले आहेत.

मणिपूरमधील गेल्या काही वर्षांतील हा सर्वांत मोठा हल्ला आहे. या हल्ल्याची जबाबदारी पिपल्स लिबरेशन फ्रंट आणि मणिपूर नागा पिपल्स फ्रंट या दहशतवादी संघटनांनी घेतली आहे. हा हल्ला आपणच केल्याचा दावा दोन्ही संघटनांनी केला आहे. पीपल्स रिव्होल्यूशनरी पार्टी ऑफ कंगलीपक या दहशतवादी गटावरही संशय घेण्यात येत आहे. ‘रिव्होल्यूशनरी पार्टी ऑफ कंगलीपक’ ही दहशतवादी संघटना स्वतंत्र मणिपूरच्या मागणीसाठी हिंसक कारवाया करते. ईशान्येकडील काही राज्यांप्रमाणे मणिपूरमध्येही अनेक दहशतवादी गट सक्रिय आहेत. एका दहशतवादी गटाने केलेल्या हल्ल्यात २०१५ मध्ये २० जवान शहीद झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. आसाम रायफल्सवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भ्याड आणि निषेधार्ह आहे, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. 

आजोबांचा वारसा

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले कर्नल विप्लव त्रिपाठी यांचे आजोबा किशोरीमोहन त्रिपाठी यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी सक्रीय राजकारणात उडी घेतली आणि ते छत्तीसगड विधानसभेवर निवडून गेले होते. विप्लव १४ वर्षांचे असताना १९९४मध्ये किशोरीमोहन यांचे निधन झाले. त्यांच्या प्रेरणेनेच विप्लव यांनी लष्करी सेवेत दाखल होण्याचा निर्णय घेतला होता, असे त्यांचे मामा राजेश पटनाईक यांनी सांगितले.

या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान कायम स्मरणात राहील. शहीद जवान आणि मृत्यू पावलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान