स्त्री समतेच्या दिशेने पहिले पाऊल टाकणाऱ्या सौदी अरेबियाच्या इतिहासात प्रथमच पाच महिला निवडून आल्या आहेत. राजधानी रियाधसह स्थानिक निवडणुकांच्या निमित्ताने येथील स्त्रियांना पहिल्यांदाच मतदानाचा व निवडणुकीला उभे राहण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. त्यात शहरापासून गावापर्यंतच्या सर्व थरांतील महिलांचा समावेश आहे.
निवडून येणाऱ्या महिलांची संख्या जरी कमी असली, तरी आतापर्यंत निवडणूकप्रक्रियेतून संपूर्णत वगळल्या गेलेल्या महिलावर्गाला या निमित्ताने प्रतिनिधीत्व मिळाले आहे. इस्लामधर्मीयांसाठी पवित्र असणाऱ्या काबा शहराजवळील मदरखा गावामध्ये सलमा अल ओतेबी निवडून आल्याची माहिती मक्का शहराचे महापौर ओसामा अल बार यांनी दिली. तर जेद्दा या सौदी अरेबियाच्या दुसऱ्या मोठय़ा शहरातून लामा अल सुलेमान निवडून आल्या आहेत. देशाच्या उत्तरेतील अल जवाफ परगण्यातून तेरा पुरूषांमध्ये हिनुफ अल हाजमी या एकमेव स्त्री उमेदवार निवडून आल्या आहेत.
या निवडणुकीला उभे राहिलेल्या महिलांनी कामकरी मातांच्या सोईसाठी जास्त वेळ सुरू राहणारी पाळणाघरे, क्रीडा आणि सांस्कृतिक गोष्टींची रेलचेल असणारी युवाकेंद्रे, चांगले रस्ते, कचरासंकलन व्यवस्थेत सुधारणा आणि वनीकरण अशी आश्वासने दिली होती.
सौदी गॅझेटमध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार रस्त्यांची दुरवस्था आणि रुग्णालयाच्या अनुपलब्धतेमुळे मदरखा गावामधील एका महिलेची कारमध्येच प्रसूती करावी लागली होती. हा मुद्दा तेथील निवडणुकीचा विषय बनला होता. त्याच मुद्दय़ावर सलमा या निवडून आल्या आहेत. या निवडणुकांना उभ्या राहिलेल्या ७ हजार उमेदवारांमध्ये ९७९ महिला होत्या.